आर्थिक अडचणीतून स्वतःवर गोळी झाडून घेणाऱ्या सराफा व्यावसायिक मिलिंद मराठे यांचा अखेर मृत्यू

पुणेव्यवसायातील मंदी तसेच आर्थिक नुकसानीमुळे लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक यांनी पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.

 

 

मिलिंद उर्फ बळवंत मराठे (वय 60, रा. रुपाली बिल्डिंग, जोशी हॉस्पिटलशेजारी, शिवाजीनगर) असे मृत्यू झालेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. दि.15 डिसेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास मराठे यांनी दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या कार्यालयात पिस्तूलातून स्वत:च्या छातीत गोळी झाडली. यानंतर त्यांना पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दहा दिवस मराठे मृत्युशी झुंज देत होते. रविवारी पहाटे 4 वाजता त्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.

 

 

मराठे यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. ते गंभीर जखमी असल्याने त्यांच्या जबाब नोंदवता आला नाही. त्यांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर कर्ज असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एम. खानविलकर करत आहेत.

 

 

मराठे यांचा मुलगा प्रणव याची चौकशी करण्यात आली होती. “व्यवसायात मंदी तसेच आर्थिक अडचणींमुळे माझ्या वडिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला,’ असे प्रणवने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

Leave a Comment