किवळेत पावणे दहा लाखांचा गांजा जप्त

  • पाच जण अटक 
  • देहूरोड गुन्हे प्रकटीकरण पोलिसांची कारवाई

देहूरोड – कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील किवळे पुलाखालील सेवा रस्त्यावर बुधवारी (दि. 28) पहाटे सव्वा एकच्या सुमारास देहूरोड गुन्हे प्रकटीकरण पोलीस पथकाने सापळा रचून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून 9 लाख, 65 हजार, 175 रुपये किमतीचा दहा किलो वजनाचा गांजा (अमली पदार्थ) जप्त केला आहे. अटक केलेल्या पाच जणांना वडगाव न्यायालयाने चार दिवसांची (दि. 31) पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमोल नारायण आडाल (वय 26, रा. गुरुकृपा हौसिंग सोसायटी, मोरे वस्ती, चिखली), अल्ताफ पाशा तांबोळी (वय 40, रा. आंबेडकरनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे), नईम रफिक शेख (वय 30, रा. कैलास मंगल कार्यालयामागे, थेरगाव), पुरुषोत्तम लक्ष्मण चौघुले (वय 21, रा. जयहिंद कॉलनी, काळेवाडी फाटा, रहाटणी, मूळगाव मु.पो. ढोराळा) आणि सुधीर पांडुरंग देवकाते (वय 24, रा. माहिजळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे प्रकटीकरणाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक प्रशांत पवार आणि नीलेश जाधव यांना खबऱ्याकडून अमलीपदार्थ विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक पवार, जाधव, सुमित मोरे, सचिन शेजाळ, दीपक शिरसाठ आदींच्या पथकाने कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील किवळे पुलाखालील सेवा रस्त्यावर सापळा रचला. तिघा संशयितांना ताब्यात घेत त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ 10 किलो वजनाचे 9 लाख, 65 हजार, 175 रुपये किमतीचा गांजा आढळून आला.

त्याची अधिक विचारपूस केली असता आणखीन दोघा जणांची माहिती मिळाल्याने याप्रकरणी पाच जणांना अटक करीत गुन्हा दाखल केला आहे. वडगाव न्यायालयात त्यांना हजर केले असता, न्यायालयाने पाच जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप करीत आहेत.

Leave a Comment