अहमदनगर – पारनेर तालुक्यातून लाखांचे मताधिक्य – नीलेश लंके

पारनेर – गेल्या २५ वर्षांपूवी स्व. गुलाबराव शेळके यांच्या माध्यमातून पारनेरकरांना खासदारकीची संधी निर्माण झाली होती. दुर्दैवाने ती संधी मिळाली नाही. तालुक्याला २५ वर्षांनंतर ही संधी आली आहे. पारनेरविषयी इतर तालुक्यात वेगळे चित्र रंगवून अपप्रचार करण्यात येतो. इतर तालुक्यात मताधिक्याबाबत अप्रचार करीत असले तरी सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावा करतानाच पारनेर तालुक्यातून किमान एक लाखांचे मताधिक्य घेऊ, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

पारनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन माजी आमदार लंके यांनी मतदारांशी संवाद साधला. भाळवणी येथे झालेल्या बैठकीत नीलेश लंके यांनी तालुक्यातील मताधिक्याविषयी आपण निश्चित असल्याचे सांगितले.यावेळी बाबासाहेब तरटे, बापूसाहेब शिर्के, गंगाराम बेलकर, प्रियंका खिलारी, संभाजी रोहोकले, राजेंद्र चौधरी, अशोक रोहोकले, दीपक पवार, नितीन अडसूळ, सुवर्णा धाडगे, बाळासाहेब पुंडे, बबन भुजबळ, आबासाहेब चेमटे, किरण ठुबे, संजय काळे, अमोल पवार, जयसिंग दावभट आदी उपस्थित होते.

लंके म्हणाले, ही निवडणूक धनशक्ती विरूध्द जनशक्ती असून, ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली आहे. मतदारांनी तालुक्याची अस्मिता व हक्कासाठी जागृत होणे आवश्यक आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या माध्यमातून ५० वर्षांत कोणताही प्रश्न सुटलेला नाही. पारनेरकरांसाठी हा लढा स्वाभिमानाचा असल्याचे सांगितले.

पारनेर येथील उद्योजक शिवाजी मते यांनी १ लाख रुपयांची मदत आ. लंके यांच्याकडे सुपूर्द केली. बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवानंद पवार यांनी लंके यांच्या निवडणूकीसाठी दोन लाखांची मदत दिली. पारनेर तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी ऐंशी टक्‌यांहून अधिक मतदान लंके यांना करण्याचे आवाहन देवानंद पवार यांनी केले.