अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीस 1 वर्षे सक्‍तमजूरी

नगर – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी आरोपी ज्ञानेश्वर रविंद्र गर्जे, (वय-20, रा.अकोला,ता.पाथर्डी,जि.नगर) याला दोषी धरून 1 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकिल संजय पाटील यांनी काम पाहिले.

पिडीत मुलगी ही तिचे आई-वडिल, आजी व भाऊ असे एकत्र राहत होते. 10 वी मध्ये शिक्षण घेत होती. 15 मार्च 2019 रोजी तिचा 10 वी चा पेपर असल्याने, ती सकाळी 10 वाचे सुमारास कॉलेजच्या परिसरात असताना आरोपी ज्ञानेश्वर गर्जे हा तिचा पाठलाग करत आला. त्यावेळी तिला तु मला खुप आवडतेस, मी तुझ्यावर खुप प्रेम करतो, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. असे म्हणून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावर तिने तु माझ्या भावासारखा आहेत, तु असे का बोलतोस. असे म्हणाली असता आरोपीने तिला याबाबत कोणाला सांगितल्यास मी तुला व तुझ्या घरच्यांना गोळया घालुन मारून टाकील असा दम दिला.

17 एप्रिल रोजी 2019 रोजी दुपारी पिडीत मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिच्या घरी असलेल्या मोबाईलवर फोन केला की, मी ज्ञानेश्वर गर्जे बोलतो, तु आज छावणीवर का आली नाही. तु माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीच होवुन देणार नाही. तु मला दररोज फोन करत जा, तु मला फोन केला नाही व याबाबत घरी सांगितल्यास तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकील,असा दम दिला. त्यानंतरही आरोपी हा पिडीतेस त्रास देतच राहीला.

आरोपी हा तिच्या घरासमोर वारंवार चकरा मारत असल्याने तिच्या आई-वडिलांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली. त्यानंतर पिडीतेने पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द पोक्‍सो कायदाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्हयाचा तपास स.पो.नि. डी.एम.राठोड यांनी करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 2 अशोककुमार भिलारे यांचेसमोर झाली.

यामध्ये पिडीत मुलगी, तिचे वडिल, नोडल ऑफिसर, पंच व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी-पुरावा, कागदोपत्री पुरावा व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी ज्ञानेश्वर गर्जे याला दोषी धरून तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन 1 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रूपये दंड ठोठावला आहे.

Leave a Comment