चिमुकल्यांच्या कोरोना लसीला मंजुरी : किती डोस द्यावे लागणार?

नवी दिल्ली : कोरोना लढाईविरोधात आता आणखी एक शस्त्र भारताच्या ताफ्यात जमा झालं आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DGCI ने लहान मुलांसाठीच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. 2 ते 18 वर्षांच्या मुलांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दिली जाऊ शकणार आहे. त्यामुळे आता कोरोनाविरुद्धची लढाई आणखी बळकट झाली आहे.

भारत बायोटेकने यावर्षी देशभरात 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सीन लसीची चाचणी घेतली होती. या मुलांना 28 दिवसांच्या अंतराने दोन डोस देण्यात आले. या चाचणीमध्ये ही लस मुलांवर प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. तसंच कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. असं असलं तरी लहान मुलांचे लसीकरण कधी सुरू होईल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लहान मुलांना लसीची गरज आहे का?
जगातील अनेक देशांमध्ये लहान मुलांवरील कोरोना लस आली आहे. इतकंच नाही तर अनेक देशांनी मुलांना लस देण्यास सुरुवातही केली आहे. तज्ज्ञांनीही लहान मुलांना लस दिली जावी असं सूचवलं आहे. लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. दुसऱ्या लाटेत अनेक चिमुकले कोरोनाबाधीत झाले होते. भारतातही अनेक मुलांना बाधा झाली मात्र सुदैवाने त्याची तीव्रता कमी होती. ज्या मुलांना कोरोना झालेला नाही, त्यांना लस दिल्यास ते आणखी सुरक्षित होतील असं तज्ज्ञांचं मत आहे.

व्हॅक्सिन सर्वात आधी कुणाला देणार?
लहान मुलांसाठी आता कोरोना लस उपलब्ध झाली आहे. ही लस देण्याची सुरुवात लवकरच होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार नव्या गाईडलाईन्स बनवत आहे. मात्र सध्या या लसींची संख्या मुबलक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे या लसी सर्वात आधी ज्यांना अन्य व्याधी जसे की कॅन्सर, अस्थमा यासारख्या गंभीर समस्या आहेत, त्यांना दिली जाणार आहे. देशात वयस्कर लोकांना ज्यावेळी लस देण्यास सुरुवात झाली, त्यावेळीही हेच निकष लावण्यात आले. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी होतो.

लसीकरणानंतर शाळा सुरु होणार का?
सध्या सर्वत्र शाळा सुरु होत आहेत, मात्र त्यासाठी अनेक निर्बंध आहेत. लहान मुलांना निर्बंधात बांधणं तसं कठीण काम आहे. त्यामुळे चिमुकल्यांना संक्रमणाचा धोका जास्त आहे. मात्र लसीकरणामुळे हा धोका कमी होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

लहान मुलांच्या व्हॅक्सिनचा केवळ बालकांनाच फायदा?
लहान मुलांना लस दिल्याने त्याचा फायदा सर्वांना होणार आहे. लहान मुलांच्या आसपास त्याचे पालक, नातेवाईक आणि चिमुकल्यांचा मित्रपरिवार असतो. त्यामुळे त्याचा फायदा सर्वांना होईल.

लहान मुलांसाठीही बूस्टर डोस?
लहान मुलांच्या लसीच्या बूस्टर डोसबाबत सध्यातरी कोणती माहिती उपलब्ध नाही. ज्येष्ठ नागरिक, आरोग्य सेवक किंवा ज्यांची अँटिबॉडी कमी होत आहे त्यांना बूस्टर डोस देण्याचा विचार आहे.