विविधा : संत चोखामेळा

– माधव विद्वांस

संत चोखोबांचे निर्वाण मंगळवेढा या ठिकाणी वैशाख वद्य पंचमी, शके 1260 (इ.स.1338) मध्ये झाले. त्यांची निश्‍चित जन्मतिथी उपलब्ध नाही, पण जन्म 1273 मधील असावा.चोखोबांचा जन्म पूर्णा नदीच्याजवळील मेहुणा या गावी झाला. चोखोबा हे यादव काळातील वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्‍वर, नामदेवांच्या प्रभावळीतील संत कवी होते. चोखोबा संत नामदेवांचे परम शिष्य होते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेव्हणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व जण कवी होते. सोयरा यांचा ‘अवघा रंग एक झाला’ हा अभंग लोकप्रिय आहे.

या चंद्रभागेच्या भक्तीप्रवाहात ज्ञानेश्‍वर, नामदेव, नरहरी सोनार, गोरा कुंभार, जनाबाई, संत सोयरा, पंढरपूरला न जाता आपल्या शेतातच भक्तीचा मळा फुलविणारे सावता माळी या सर्वांच्या कवनाची भर पडली. यात चोखोबांचा मोठा वाटा आहे. संत चोखोबांनी पंढरपूर यात्रेचे सुंदर वर्णन केले आहे, ॥ वाजवावी गुढी उभारावी। वाट ही चालावी पंढरीची॥ पंढरीचा हाट भक्तीची पेठ। मिळाले चतुष्ट वारकरी॥ पताकांचे भार मिळाले अपार। होतो जयजयकार भीमातीरी॥

खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा॥ असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठा, अभेद भक्ती उपेक्षितांपर्यंत नेऊन पोहोचवली. त्यांचे काव्य अनंत भटाने लिहून ठेवले आहे. चोखोबांनी अनेक अभंग व पदे लिहिली असून त्यांच्या नावावर विवेकदर्पण हे प्रकरणही आढळते. यामधे पत्नी सोयराचे कृष्णचरित्रावर काही अभंग आहेत. बंकाचेही गुरूपरंपरेवरील अभंग आहेत. चोखामेळ्याच्या अभंगांतून तत्कालीन सामाजिक विषमता, अन्याय व सोवळेओवळे यांबाबतची व्यथा व्यक्त होते.

॥ घाली विठु आतां चालुं नको मंद। मज मारिती बडवे कांहीतरी अपराध॥ विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला। शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटला॥ कर जोडोनी चोखा विनवितो देवा। बोलिलो उत्तर याचा राग नसावा॥ या अभंगातून त्यावेळच्या त्यांना झालेल्या त्रासाची व्यथा मांडली आहे. (हे गीत मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केले असून बालगंधर्वांनी ‘संत कान्होपात्रा’ या नाटकासाठी गायले आहे) सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे तो महाराज ज्ञानेश्‍वर माऊली जेणे निगमावली प्रकट केली, या अभांगातून ज्ञानेश्‍वरांची माहिती सांगितली.

संत बंका त्यांच्या काव्यात म्हणतात, चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ॥ चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तीचा आगर॥ चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साउली॥ चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण॥ संत तुकाराम त्यांच्याबद्दल म्हणतात, तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती!! थोडक्यात ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणजे चोखा मेळा होय. अबीर गुलाल उधळित रंग, जोहर मायबाप जोहार, सुखाचे हे सुख चंद्रभागेतटीं, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी असे त्यांचे अभंग ध्वनिमुद्रित झाले असून लोकप्रिय आहेत.

पंढरपूर तालुक्यातील तन्हाळी गावचे रत्नाकर महाराज हे चोखोबांच्या पुण्यतिथीचा उत्सव वैशाख वद्य पंचमी भजन कीर्तन पारायण इत्यादी माध्यमातून साजरा करत असत. त्यांच्या सहवासातून पुढे मंगळवेढ्यातील कृष्णा रघुनाथ शेंबडे यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांचे वंशज व नातेवाईक ही परंपरा पुढे चालवत आहे. वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांच्या अभंग गाथा पारायणास मंगळवेढा जि. सोलापूर येथे सन 2013 मध्ये सुरुवात केली.