उड्या कशा मारायच्या, हे शिवसेनेने दाखवले

पुणे- “उड्या कशा मारायच्या, हे शिवसेनेने नेहमीच दाखवून दिले आहे. ममता बॅनर्जी आल्या, की त्यांना तुमच्यासोबत आहे म्हणायचे. राहुल गांधी यांना भेटल्यावर तुमच्याशिवाय काय होणार, असे म्हणायचे. यालाच उड्या मारणे असे म्हणतात,’ अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर केली.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पाटील यांनी बुधवारी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, “लोकसभा निवडणुकीला अडीच वर्षे असताना सर्वांनी एकत्र येण्यासाठी कोणी रोखले नाही. त्यांच्यात नेता कोण, यावरून संभ्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ काम करत आहेत. 2019 मध्येही विरोधकांची एकजूट होतीच. तेव्हाही भाजपा जिंकली. भाजप एकजूट यूपीएला टक्कर देण्यासाठी केव्हापासूनच तयार आहे.
भाजपाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 418 जागा मिळतील, असा आमचा सर्व्हे सांगत आहे. आताचे राज्य सरकार कायद्याचा अभ्यास नसणारे आणि गोंधळ असणारे सरकार आहे.’

सकारात्मक निर्णय घेण्याचे पोलीस आयुक्‍तांचे आश्‍वासन
सवाई गंधर्व महोत्सवास 50 टक्‍के उपस्थितीसह परवानगी द्यावी. शनिवारवाडा देखील कार्यक्रमासाठी खुला करावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी पोलीस आयुक्‍तांकडे केली. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यावेळी दिले. पाटील यांनी महोत्सवाचे संयोजक श्रीनिवास भीमसेन जोशी, भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासमवेत गुप्ता यांची भेट घेतली. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यावेळी उपस्थित होते.