“खाया पिया कुछ नही…”, राज ठाकरेंच्या सभेत मनसे जिल्हाध्यक्षाला 10 लाखांचा फटका

मुंबई – एखाद्या ठिकाणी आपल्याला नाहक भुर्दंड पडला की, आपण नेहमीच “खाया पिया कुछ नही बील बारा आणा” ही हिंदीतील म्हण वापरतो. असाच काहीसा अनुभव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांना आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे प्रचंड गर्दीची सभा पार पडली. या सभेसाठी राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या सभेतील गर्दीत मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांच्या 200 ग्रॅम वजनाच्या आणि तब्बल 10 लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या साखळीवर चोरांनी हात मारला.

नांदेड जिल्ह्यातील गोल्डमॅन म्हणून मॉन्टीसिंग जहागीरदार यांची ओळख आहे. मॉन्टीसिंग जहागीरदार हे आपल्या अंगावर जवळपास 50 तोळे सोने नेहमी परिधान करतात. पण राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्यावर डोळा ठेवून दहा लाख किंमतीची 200 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केली.

मॉन्टीसिंग जहागीरदार हे व्यापारी उद्योगपती असून गेल्या 16 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करतात. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे याठिकाणी राज ठाकरे यांनी केलेल्या विविध आंदोलनात आतापर्यंत मॉन्टीसिंग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.