शाळांसाठी फिरते आरोग्य केंद्र!

शालेय शिक्षण विभागाचे पालिका, जिल्हा परिषद प्रशासनाला आदेश

पुणे – राज्यात शाळा सुरू करताना महापालिका, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आवश्‍यकतेप्रमाणे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करून घेण्यासाठीचे नियोजन
करावे लागणार आहे. 5 ते 10 शाळांसाठी फिरते आरोग्य तपासणी केंद्रही कार्यरत ठेवण्याचे बंधन शासनाने घातले आहे.

शालेय शिक्षण विभागाने शाळांबाबत संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी व नंतरही महापालिका, जिल्हा परिषद यांच्या आरोग्य विभागाची जबाबदारी
निश्‍चित करून दिली आहे. शाळेचा परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करावा लागणार आहे. सॅनिटायझर, मास्क व आवश्‍यक निर्जंतुकीकरण साहित्य जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. यासाठी ग्रामपंचायत निधीचा आवश्‍यकतेप्रमाणे वापर करावा लागणार आहे.

शालेय परिसरात व स्वच्छता गृहात पुरेशा प्रमाणात साबण व पाण्याची व्यवस्थाही करावी लागणार आहे. करोना संसर्ग झालेल्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या मदतीने सर्व मुलांची व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागणार आहे. विशेषत: मुख्यालयात न राहणारे व बाहेर गावातून येणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे. एखादा विद्यार्थी, शिक्षकास आजारपणाची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करण्याची व्यवस्थाही करावी लागणार आहे, असे शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Leave a Comment