मोदींनी देशाला आर्थिक संकटात नेण्याचे पाप केलं

श्रीरामपूर – गेल्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप केले आहे. १० वर्षांत मोदींनी काढलेले कर्ज कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला? हे आता सांगावे. मोदींचे पंतप्रधान कार्यालय आता ईडी, सीबीआय व जीएसटीमुळे वसुली कार्यालय झाले आहे. इलेक्ट्रोल बॉंड हा देशामधील सर्वात मोठा घोटाळा असून, भाजप सरकारने केला आहे. या देशाचा पंतप्रधान कोरोना काळामध्ये लोकांच्या आरोग्याशी खेळतो, त्याला काँग्रेसने मौत का सौदागर म्हणणे योग्यच होते. त्यांना आता आपण सत्तेवर बसवायचे का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

लोकसभेच्या शिर्डी मतदारसंघातील वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथे संविधान निर्धार सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. किसन चव्हाण होते. यावेळी राज्य प्रवक्ता दिशा शेख, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, चरण त्रिभुवन, किशोर ठोकळ, बाबा शेख, शिवा साठे, प्रमोद बारसे आदीं उपस्थित होते. महापुरुषांना अभिवादन करून तसेच समता सैनिक दलाची सलामी होऊन सभेस सुरुवात झाली.

आंबेडकर म्हणाले, कोरोना काळात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या जगातील महत्त्वाच्या संस्थेने रेमडीसीवर देऊ नये, इतर देशांनी त्याला बंदी घातली असताना देखील पंतप्रधान मोदी यांनी त्या कंपनीला मुभा दिली. कारण त्या कंपनीचा मालक गुजराती होता. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रात व नगर जिल्ह्यात उभारलेली कारखानदारी आणि आज कारखानदारीत सुरू असलेले नात्यागोत्याचे राजकारण जिल्ह्याच्या विकासातील प्रमुख अडथळा ठरल्याची टीका केली.

वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी सांगितले की, आपल्या विरोधातील दोनही उमेदवार हे बिनकामाचे उमेदवार आहे. एकावर घोटाळ्याचे आरोप आहे तर दुसरा आपल्या पक्षात आहे, तेच कळत नाही. ७५ वर्षांमधे प्रथमच महिलेला उमेदवारी मिळाली असून वंचितने कायमच महिलांचा व तळागाळातील जनतेचा विचार केला आहे.त्यामुळे येत्या १३ तारखेला या मतदारसंघात इतिहास घडवूया व संविधान सुरक्षित ठेवू या, असे आवाहन केले. या संविधान निर्धार सभेस हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष उपस्थित होते.