तीन वर्षात मोदींच्या तीनशे लाख कोटींच्या घोषणा ; चिदंबरम यांनी उडवली खिल्ली

नवी दिल्ली  – गेल्या तीन वर्षातील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वेळी शंभर लाख कोटी रूपयांच्या विकास योजनांची घोषणा केली आहे.

तीन वर्षात तब्बल तीनशे लाख कोटी रूपयांच्या घोषणा करून देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही अधिक खर्चाच्या विकासाच्या योजना लोकांपुढे ठेवल्या आहेत, त्याबद्दल लोकांनी आनंदी असायला हवे आहे, अशी खिल्ली ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी उडवली आहे.

कालच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी शंभर लाख कोटी रूपये खर्चाची गतिशक्ती विकास योजना जाहीर केली आहे. त्या आधी मोदींनी 2019 च्या पंधरा ऑगस्टच्या भाषणात पायाभूत विकास कामांसाठी शंभर लाख कोटी रूपयांची घोषणा केली होती, त्यानंतर 15 ऑगस्ट 2020 च्या भाषणातही मोदींनी पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी शंभर लाख कोटी रूपयांची घोषणा केली होती.

भारताला तीन वर्षात तीनशे लाख कोटी रूपयांच्या योजनांचा लाभ झाला आहे. दरवर्षी भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा विकास योजनांवरील खर्चाचे घोषित आकडे कैक पटींनी वाढते राहिले आहेत त्याबद्दल जनतेने समाधान व्यक्त केले पाहिजे असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

दर वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदी करीत असलेल्या या शंभर लाख कोटी रूपयांच्या घोषणांची सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली गेली आहे.