‘मोदी यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी…’ – नाना पटोले

 मुंबई – भाजपा राजकीय विरोधकांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर तपास थांबवण्यात येतो, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी हे आरोप फेटळून लावले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी भाजपा नेतृत्वावर ईडी कारवाईवरून टीका केली आहे. “मोदी यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली आहे”, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले,’फडणवीस आणि मोदी यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी झाली आहे. त्यांना वाटते कोणाला काही कळत नाही. ठाण्यातील दोन नेत्यांवरील कारवाई थांबण्यात आली. यासंदर्भातील यादी काँग्रेसच्या नेत्याने यापूर्वीच जाहीर केली आहे. खोटे बोल, पण रेटून बोल याप्रमाणे फडणवीस यांचे सुरू आहे, अशी टीका पटोले यांनी केली’

तत्पूर्वी, विधान परिषद निवडणुकीसाठी आमच्या उमेदवारांकडे गरजेपेक्षा जास्त मते आहेत, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करत आहेत. दबाव टाकला जात आहे, असा थेट आरोपही पटोले यांनी केला आहे. या फोनचे रेकॉर्डींग आमच्याकडे आहे, असे ते म्हणाले.

विधानपरिषद निवडणुकीकरिता विरोधकांना 22 मते हवी आहेत. पण एवढी मते त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, पैशांचा वापर आता भाजपला करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीतल्या आमदारांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून फोन केले जात आहेत. स्विस बॅंकेत 2 वर्षांत 212 टक्के पैसे वाढले आहेत. मात्र, कॉंग्रेसला बदनाम केले जात आहे. आता सत्ता आणि पैसे कोणाकडे आहे ते सगळ्यांना माहिती आहे.

भाजपचा काळा चेहरा समोर आला आहे, असे नाना पटोले म्हणाले. ठेकेदारीने सैन्यभरती करण्यात येत आहे. अग्निपथवरुन तरुण विरोधात आहे. ही भाजपच्या पराभवाची सुरुवात आहे, असे नाना पटोले म्हणाले