नगर | मोहोज शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

नगर (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील मोहोज बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (दि. १७) रात्री मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पांडुरंग महाराज फसले यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. आपल्या मुलांचा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. पालकांचा उदंड प्रतिसाद व बालकांनी गाण्यांवर धरलेला ठेका यामुळे कार्यक्रमात रंगत आली.

मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मोहोज जिल्हा परिषद शाळेतही शनिवारी आयोजित कार्यक्रमात चिमुकल्यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. २० गाणी व नाटकांचे सादरीकरण या कार्यक्रमातून करण्यात आले. रात्रीचे ११ वाजले तरीही चिमुकल्यांसह पालकांमध्ये उत्साह कायम होता.

उत्कृष्ट साऊंड सिस्टिम, बहारदार आवाज व स्टेजवर केलेली उत्कृष्ट सजावट यामुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी जाधव, सरपंच सोनाली जाधव, उपसरपंच रामनाथ डोळसे, माजी सरपंच निशा फसले, शिवाजी मचे, शिक्षक बँकेच्या पाथर्डी शाखेचे शाखाधिकारी माने, शिक्षक बंडू नागरगोजे, गायकवाड, कासार, फसले आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधु बर्डे, शिक्षिका इंदू दहिफळे, शिक्षक नगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.