पिंपरी | चिखलीतील रेनवा टोळीवर मोकाची कारवाई

पिंपरी (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. चिखलीतील रेनवा टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. मागील तीन महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सात गुन्हेगारी टोळ्यांवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे.

चिखली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तपासामध्ये टोळी प्रमुख निलेश पुखराज रेनवा (वय २७, रा. टॉवर लाईन, म्हेत्रे वस्ती, चिखली), रोहन कमलाकर कावळे (वय २१, रा. नेवाळे वस्ती, चिखली), दत्तात्रय संतोष शिंदे (वय २३, रा. मोरे वस्ती, चिखली), सुमित विलास क्षिरसागर (वय २०, रा. ताराबाई चौक, शिवकृपा कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) यांच्यासह विधी संघर्षीत दोन बालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

टोळी प्रमुख निलेश रेनवा व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण सात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात चिखली, वाकड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, चोरी, खंडणी, तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या जिवघेणी हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

टोळीमधील सदस्यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्‍त कार्यालयाकडे सादर केला होता. प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करून या गुन्ह्यामध्ये आणखी काही कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पारीत केले.