Monsoon 2024: जूनमध्ये किती पाऊस पडेल ? हवामान खात्याने सांगितला अंदाज

Monsoon Latest Update : एकीकडे कडाक्याच्या उन्हामुळे देशात हाहाकार माजला आहे तर दुसरीकडे हवामान खात्याने दिलासा देणारी बातमी दिली आहे. मान्सून लवकरच दाखल होणार आहे. यावेळी मान्सून जोरदार कोसळेल. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, यावेळी मान्सून वेळेपूर्वी दाखल होईल. केरळमध्ये साधारणत: 1 जून रोजी मान्सून दाखल होतो, मात्र यावेळी 31 मेपासून पावसाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात मान्सून 10 ते 11 जून दरम्यान दाखल होईल, तर दिल्लीत 29 जूनपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात 18 ते 20 जून दरम्यान मान्सूनचा पाऊस पडेल.

जूनमध्ये किती पाऊस पडेल ?

देशभरात जून महिन्यात सामान्यपेक्षा जास्त (सरासरी LPA च्या 92-108%) पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारत, वायव्य आणि ईशान्य भारताला लागून असलेल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तर वायव्य भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात, मध्य भारताच्या पूर्व भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.

जून ते सप्टेंबर या काळात पाऊस नेहमीपेक्षा जास्त पडेल –

IMD ने म्हटले आहे की, संपूर्ण देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य मोसमी पावसाच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, जो सामान्य पावसापेक्षा जास्त आहे, मॉडेल त्रुटी 4 टक्के आहे. मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मान्सूनचा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल (LPA च्या 106%), तर ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे (LPA च्या 94%).