पावसाळी पर्यटन जीवावर; चार जणांचा बुडून, एकाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू

पुणे – सलग पाच दिवसांच्या सुट्या आल्याने पावसाळी पर्यटनासाठी भोर, वेल्हे, मुळशी धरण आणि गड-किल्ले क्षेत्राजवळ पर्यटकांची शनिवार (दि. 12) ते बुधवार (दि. 16) गर्दी होती. मात्र, या तीन तालुक्‍यांत वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांवर काळाने झडप घातल्याच्या घटना घडल्या असून, भोरमधील दोन, वेल्ह्यात एक आणि मुळशीत एकाचा बुडून, तर एकाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला आहे. रिहे, भेगडेवाडी (ता. मुळशी) बंधाऱ्यात पोहायला उतरलेल्या तीनपैकी एक संगणक अभियंता हर्षित पोटलुरी (वय 27, मूळगाव राजा मंदिर, आंध्र प्रदेश, सध्या रा. हिंजवडी, ता. मुळशी) याचा बुडून मृत्यू झाला.

पौड पोलीस स्टेशनचे पोलीस, आपत्ती व्यवस्थापन समितीचे पथक आणि मारुंजी स्टेशनच्या पथकाने शोधमोहीम राबवल्यानंतर हर्षितचा मृतदेह सापडला आहे. हर्षित दोन मित्रांसोबत फिरायला आला होता. बंधाऱ्यात भिंतीपासून शंभर फूट आत आणि बारा फूट खोलीवर बुडल्याची माहिती दोन तासांच्या शोधकार्यानंतर समजली. माण (ता. मुळशी) हंगामी वायरमन म्हणून काम करत असलेला जनक कामगुंडा (मूळ रा. लातूर, सध्या राहणार माण, ता. मुळशी) हा पांडवनगर, हिंजवडी येथे विद्युतवाहक तारांपाशी बिघाड दुरुस्तीचे काम करत होता. त्याला विजेचा धक्‍का लागला. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली.

भोरमध्ये बाप-लेकीचा बुडून मृत्यू

भाटघर धरण (ता. भोर) येथे बॅकवॉटरला वेळवंड-पांगारी खोऱ्यातील जयतपाड (ता. भोर) येथे फार्म हाऊसवर पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील बाप-लेकीचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 15) घडली आहे. याबाबत भूषण वामन फालक (वय 43, रा. बालेवाडी) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऐश्‍वर्या शिरीष धर्माधिकारी (वय 13) आणि शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय 45, रा. औंध, पुणे) असे बाप-लेकीचे नाव आहे.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण फालक हे त्यांच्या आणि धर्माधिकारी कुटुंबासह येथील फार्म हाऊसवर दोन दिवसांसाठी पर्यटनाला आले होते. फार्मवरील केअर टेकर दत्तात्रय शेडगे यांनी धरणाच्या खोल पाण्यात जाऊ नका, असे सांगितले होते. मात्र, शिरीष धर्माधिकारी हे पोहता येते असे सांगत धरण्याच्या पाण्यात मुलीसह उतरले. पाच-सहा मिनिट ते पोहत होते मात्र, नंतर ते दोघे धरणाच्या पाण्यात ओढले गेल्याने पाण्यात बुडाले.

राजगडावर तलावात बुडून युवकाचा मृत्यू

किल्ले राजगडावर (ता. वेल्हे) मित्रांसह फिरायला आलेल्या अजय मोहन कल्लामपारा (वय 33, रा. भिवंडी) या तरुणाचा पद्मावती माचीवरील तलावामध्ये तोल जाऊन पडल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्‍ट्‌स कंपनीमध्ये हा युवक नोकरीस होता. मध्यरात्री मित्रांना सांगून शौचाला गेला होता. तो पहाटे न दिसल्याने गडावरील अन्य पर्यटक व पुरातत्व विभागाचे कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शोध घेतला असता तलावाशेजारी त्याची चप्पल, टॉर्च व पाण्याची बाटली सापडली.