तीन लाखांहून अधिक नागरिकांची झाली करोना चाचणी

  • एका दिवसात 872 करोनाबाधित ः 16 रुग्णांचा मृत्यू

पिंपरी – गेल्या सहा महिन्यांपासून शहरात ठाण मांडून बसलेल्या करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात करोना चाचण्या घेण्यात येत आहेत. या चाचण्यांनी आता तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत शहरात एकूण तीन लाख 168 जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 24 हजार 982 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर शहरातील 72 हजार 476 जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच शहराबाहेरील नागरिकांना देखील महापालिकेने उपचार उपलब्ध करुन दिले. शहराबाहेरील 5727 करोनाबाधित आढळून आले. गेल्या 24 तासांमध्ये 872 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले तर 16 करोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार बुधवारी शहरातील 835 आणि शहराबाहेरील 37 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच शहरातील 15 आणि शहराबाहेरील एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला. गेल्या 24 तासांमध्ये 557 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 72476 जणांना करोनाची लागण झाली आहे तर त्यापैकी 62255 रुग्ण उपचारांनंतर घरी परतले आहेत आणि 1190 शहरातील रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 5426 संशयित रुग्ण दाखल झाले असून गेल्या दोन दिवसांमध्ये 4349 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 2710 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. सध्या महापालिकेच्या रुग्णालय आणि कोविड सेंटर मध्ये 5197 करोनाबाधित उपचार घेत आहेत. तसेच शहराबाहेरील 1173 रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

Leave a Comment