महाराष्ट्र हादरवणारी घटना! बेड मिळत नसल्याने रुग्णाचे ऑक्सिजन मास्क लावून आंदोलन; रुग्णालयात मृत्यू…

नाशिक – राज्यातील करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन करण्याच्या विचाराधीन असून याबाबतचा निर्णय उद्या (२ एप्रिल) घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात करोना रुग्णसंख्येचा अचानक विस्फोट झाल्याने अनेक ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना नाशिक येथे घडली असून येथे एका करोनाबाधित रुग्णाने उपचारांसाठी रुग्णालयात जागा मिळत नसल्याने ऑक्सिजन मास्क लावत नाशिक महापालिकेसमोर धरणे आंदोलन केलं.

प्राप्त माहितीनुसार, बाबासाहेब नावाच्या या ३८ वर्षीय व्यक्तीला करोना विषाणूची बाधा झाली होती. मात्र उपचारासाठी शहरातील कोणत्याही रुग्णालयात बेड मिळत नसल्याने त्यांनी नाशिक महापालिकेसमोर बुधवारी रात्री ऑक्सिजन मास्क लावत धरणे आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनानंतर त्यांना महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी ४० टक्क्यांपर्यंत घटल्याने त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी आता नाशिक महापालिका व पोलीस प्रशासनाकडून रुग्णाला आंदोलन करण्यासाठी कोणी भडकवले का? याची चौकशी करण्यात येत आहे.

राज्यामध्ये करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा ताण आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी करोना रुग्णसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या नागपूर शहरामध्ये एकाच बेडवर दोन करोना रुग्ण उपचार घेत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता.

दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील ठाकरे सरकारसमोर मोठं संकट उभं राहिलंय. एकीकडे लॉकडाऊनमुळे थांबलेले आर्थिक चक्र तर दुसरीकडे रुग्णसंख्येचा स्फोट अशा दुहेरी आव्हानाचा सामना सरकारला करावा लागतोय.

Leave a Comment