Amol kolhe : खासदार अमोल कोल्हे यांची अजित पवार गटावर जहरी टीका; म्हणाले,”नकली आयाळ लावलेल्या सिंहांनी…”

Amol kolhe :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा स्वाभिमानी मेळावा  नुकताच पार पडला. या मेळाव्यात शरद पवारांपासून ते जयंत पाटील यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. त्यात खासदार अमोल कोल्हे  यांनी अजित पवार गटावर जहरी केली आहे.

या मेळाव्यात अमोल कोल्हे यांनी ऐतिहासिक दाखले देत राज्य सरकार आणि अजित पवार गटावर बोचरी टीका केली. अजित पवार गटाने महिन्याभरापूर्वी कर्जत येथे पक्षाचे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात शरद पवार गटावर टीकाटिप्पणी करण्यात आली होती. अमोल कोल्हे यांनी या शिबिराचा उल्लेख करताना, ‘कर्जत तालुका रायगड जिल्ह्यात येतो. तेव्हा कर्जतमध्ये येऊन डरकाळ्या फोडताना पाहून किल्ले रायगडानेही डोळे वटावरून पाहिले असेल.

“कर्जतचे शिबिर झाले, तेव्हा किल्ले रायगडाने डोळे वटारून पाहिले असेल. त्या शिबिरात, रायगडाच्या मातीचा उल्लेख केला, स्वाभिमानाच्या उदाहरणांचा उल्लेख केला. मात्र त्याच शिबिरात नकली आयाळ लावलेले सिंह डरकाळ्या फोडत होते, तेव्हा रायगडानेही त्या सिंहाकडे सुद्धा डोळे वटावरून पाहिले असेल. रायगड म्हणाला असेल, माझ्या अंगाखांद्यावर खेळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या दरबारात उभे राहिल्यानंतर स्वाभिमानाची डरकाळी फोडली होती. आज दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालणारे, याच मातीत येऊन बोलतायत”, अशी टीका करताना कोल्हे यांनी अजित पवार गटाच्या एकाही नेत्याचे नाव घेता टीका केली.

खासदार अमोल कोल्हे पुढे म्हणाले, “लाचारीच्या भावनेनं पायावर डोकं ठेवण्यासाठी मान झुकवली तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाही, म्हणून फक्त पक्षाच्या शिबिरामध्ये डरकाळ्या फोडणारे कधीच दिल्लीश्वरांना प्रश्न विचारू शकत नाहीत. आमच्या कांद्याची निर्यात का बंद केली? माझ्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला पाहीजे आणि माझ्या महाराष्ट्रातील उद्योगधंदे का पळविले? हे प्रश्न दिल्लीश्वरांच्या डोळ्यात डोळे घालून विचारू शकता का?” कर्जतच्या शिबिरात स्वाभिमान आणि विकासाच्या गप्पा मारण्यात आल्या. पण स्वाभिमान आणि विकास कुठं आहे, असा प्रश्न जनता आज विचारत आहे, असेही कोल्हे म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी, “शरद पवार यांनी २५ वर्ष पक्षाला तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं. पक्षाला वाढविण्यासाठी, मान्यता मिळवून देण्यासाठी स्वतःच्या आजाराची पर्वा केली नाही. अविरत धावत राहिले. अशा शरद पवारांना जेव्हा निवडणूक आयोगात जाताना आम्ही पाहिलं. तेव्हा प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तेव्हाच महाराष्ट्राने निर्णय घेतला की ज्यांनी अख्खी ५५ वर्ष महाराष्ट्रासाठी चंदनासारखा देह झिजवला, त्यांना दगा देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल.

राज्यात नवीन चाणक्य तयार झाल्याच्या चर्चांचाही समाचार अमोल कोल्हे यांनी घेतला. ते म्हणाले, “जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारायचे बंद होतात, तेव्हा अंधभक्ताच्या टोळ्या तयार होतात आणि या टोळ्या कुणालातरी चाणक्य म्हणतात. याचा पक्ष फोड, त्याचा पक्ष फोड आणि माणसं गोळा कर… याला कुणी चाणक्य म्हणतं का? पक्ष फोडून पुरुषार्थ गाजवता येत नाही. ज्याच्या मनगटात ताकद असते, तो स्वतःच्या हिमतीवर माणसं गोळा करून पक्ष वाढवतो. पक्ष फोडण्यात कसला आलाय पुरुषार्थ?” असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे.