MP Assembly Election: भाजपशी दोन हात करण्यासाठी काॅंग्रेस सज्ज

नवी दिल्ली  –मध्यप्रदेशात चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या रणसंग्रामासाठी कॉंग्रेसने विविध समित्यांची स्थापना केली. त्यामुळे सत्तारूढ भाजपशी दोन हात करण्यासाठी तो पक्ष सज्ज झाल्याचे दिसते. कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष कमल नाथ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक समितीची स्थापना केली. त्या 20 सदस्यीय समितीमध्ये ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि पक्षाच्या इतर महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. कॉंग्रेसने प्रचार समितीही स्थापन केली.

माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांना त्या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. भुरिया यांच्या रूपाने आदिवासी नेत्याकडे त्या पक्षाने प्रचाराची सुत्रे सोपवली आहेत. नाथ आणि सिंह हेही प्रचार समितीचे सदस्य असतील.

मागील विधानसभा निवडणुकीत बाजी मारून कॉंग्रेसने मध्यप्रदेशात सरकार स्थापन केले. मात्र, बंडखोरीमुळे त्या पक्षाला सत्ता गमवावी लागली. काही आमदारांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे त्या राज्यातील सत्तेत कमबॅक झाले. त्या राजकीय घडामोडींचा वचपा आगामी निवडणुकीत काढण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे.