MP Election Result 2023 : मध्य प्रदेशच्या निकालावर ज्योतिरादित्य सिंधियांची प्रतिक्रिया, म्हणाले” केंद्रीय नेतृत्व आणि राज्य …”

Madhya Pradesh Election Result 2023 Live Updates : देशातील चार राज्यांमध्ये सध्या निवडणूक होत आहे. तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागतोय. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश या तीन राज्यांमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर तेलंगणामध्ये मात्र केसीआर यांच्या सत्तेला काँग्रेसने धक्का दिल्याचं निकालाच्या  ट्रेंडवरून दिसतं आहे.

निकालाच्या ट्रेंडनुसार  भाजपला मध्यप्रदेश राज्यात मिळालेल्या प्रचंड बहुमतावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एएनआयशी संवाद साधला.  ते म्हणाले की, ‘लाडली बेहन’ योजना गेम चेंजर ठरली आणि हे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यामुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले.

पुढे प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना सिंधिया म्हणाले की, केंद्रीय नेतृत्व आणि राज्य नेतृत्वामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे भाजपला मोठे यश मिळाले आहे. भाजपला आघाडी मिळाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आपल्या कमकुवत गडाची म्हणजेच ग्वाल्हेर-चंबळ विभागाची जबाबदारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, नरेंद्र सिंह तोमर आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याकडे दिली होती. यापैकी ग्वाल्हेर विभाग हा प्रामुख्याने सिंधियाच्या ताब्यात होता. आता कल स्पष्ट होत असल्याने या भागात भाजपला बंपर यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, नरेंद्रसिंग तोमर आणि नरोत्तम मिश्रा यांच्या बालेकिल्ल्यात गडबड होताना दिसत आहे. याचा अर्थ भाजपने सिंधिया यांना स्वीकारले आहे आणि मध्य प्रदेशातील जनतेनेही हे संयोजन स्वीकारले आहे, हे सिद्ध होत आहे.

चंबळ विभागातील 13 जागांपैकी भाजपला चार जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र, ग्वाल्हेर विभागाबाबत बोलायचे झाले तर येथे 21 पैकी 13 जागा भाजपला मिळत आहेत. येथे दतियाची जबाबदारी नरोत्तम मिश्रा यांच्याकडे होती. म्हणजेच सिंधिया यांनी जी काही जबाबदारी घेतली त्यात ते यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्वाल्हेर चंबळ विभागातील एकूण जागांवर बोलायचे झाल्यास 34 पैकी 17 जागांवर भाजपची आघाडी आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की ज्या भागात एक्झिट पोल भाजपला केवळ 4 ते 8 जागा जिंकत असल्याचे दाखवत होते, तिथे सिंधियाच्या जादूमुळे भाजप निम्म्या जागांवर आघाडीवर आहे.