खासदार कोल्हेंचा दौरा अन्‌ दोघांना पोलीस ठाण्यात डांबले

आढळराव पाटील यांच्या मध्यस्थीनंतर चार तासांनी सुटका
पत्रकार परिषद घेत शिवसेनेकडून निषेध व्यक्‍त

मंचर : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्‍यात आदिवासी भागातील विविध प्रश्‍न यासंदर्भात केलेली पोस्ट व त्या संदर्भात कोल्हे यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या दोन आदिवासी बांधवांना घोडेगाव पोलिसांनी ताब्यात घेत चार तास पोलीस ठाण्यात ठेवल्याची घटना निंदनीय असून याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. असे आरोप शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी केले.

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते. याबाबत गिरे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांनी आदिवासी भागातील जनतेला विविध आश्‍वासने दिली होती. या आश्‍वासनांची पूर्तता त्यांना करता आली नाही. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे आज (सोमवारी) ते आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागाचा दौरा करणार होते.

ते दौरा करणार असल्याचे समजताच आदिवासी भागातील माजी सरपंच रामदास भोकटे व एक सहकारी यांनी सोशल मीडियावर कोल्हे यांना काही प्रश्‍न विचारले. करोना काळात मदतीची गरज असताना खासदार कोठे होते? हिरड्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही ती कधी मिळणार? आदिवासी भागात धरण असतानाही पाण्याचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही? आदिवासी बांधवांसाठी खासदार कोल्हे यांनी आतापर्यंत किती निधी आणला? या प्रश्‍नांची उत्तरे द्यावी तसेच ते आदिवासी भागात आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवू अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियावर केली होती. याबाबत खासदार कोल्हे यांचे पीए यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात याबाबत कळवून ही व्यक्तीवर कारवाई करण्यास सांगितले. असता घोडेगाव पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करून या नागरिकांना पकडून तब्बल चार तास घोडेगाव पोलीस ठाण्यात ठेवले.

याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळतात तालुका प्रमुख अरुण गिरे, रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले यांनी याबाबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना माहिती दिली. आढळराव पाटील यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत घोडेगाव पोलीस ठाण्यात जाऊन जिल्हा पोलीस प्रमुख अंकित गोयल यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात संबंधित नागरिकांना सोडून देण्यात आले.

आदिवासी भागातील नागरिकांच्या संतापाला खासदार डॉ. अमोल कोल्हे कारणीभूत असून गेली चार वर्षे ते मतदारसंघात फिरकलेच नाही. त्यामुळे मतदार नाराज आहेत. कोल्हे यांना सर्वात जास्त मतदान हे आदिवासी भागातून झाले आहे. त्यांच्यावर अन्याय करू नका अन्यथा कोल्हे यांच्या विरोधात आंदोलन करू.
– रवींद्र करंजखेले, माजी सदस्य पंचायत समिती