पुणे-लोणावळा लोकल दुपारच्या वेळी सुरू करण्याचा खासदारांचा आग्रह

पुणे – सोलापूर-पुणे-मुंबई वंदेभारत रेल्वे गाडीच्या वेळेत बदल व्हावा, पुणे-लोणावळा दुपारी बंद असलेली लोकल सुरू व्हावी, असे खासदारांनी पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर सांगितले. सोलापूर-पुणे-मुंबई मार्गावर सुरू झालेल्या वंदे भारत गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. सकाळी 6 वाजता सोलापूरहून निघणारी वंदेभारत ट्रेन दुपारी 12.30 वाजता मुंबईत पोहचते.

तर 4.10 मिनिटांनी ही ट्रेन मुंबईवरून सोलापूरकडे निघते. त्यामुळे शासकीय कामे, न्यायालयीन प्रकरणे किंवा अन्य कामांसाठी आलेल्या नागरिकांना तीन ते साडेतीन तासांत काम उरकून पुन्हा येणे शक्‍य नाही. त्यामुळे मुंबईहून सुटणारी वंदे भारत ट्रेन चार ऐवजी सायंकाळी 6.10 वाजता सोडण्यात यावी, अशी मागणी डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी केली.

पुणे-लोणावळा लोकल सेवा दुपारी बंद असते. मात्र, या वेळेत अनेक कामगार वर्ग आणि विद्यार्थी प्रवास करतात. त्यामुळे दुपारच्यावेळी लोकसेवा सुरू राहावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. तसेच सिंहगड एक्‍सप्रेसला दोन डबे जोडण्याला संमती दिली असून, एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे, असे बारणे यांनी सांगितले.

फलटण-बारामती मार्गाचे काम सुरू

फलटण-बारामती या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाला सुरवात झाली आहे. त्यासाठी हजार कोटीचा निधी मिळाला असून, याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हा मार्ग सुरू झाल्यावर प्रवाशांना फायद्याचे होईल. पंढरपूर, कुर्डवाडी, फलटण, वाठार आणि लोणंद स्थानकांचा अमृत भरत योजनेत समावेश झाला आहे, असे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी सांगितले.