पुणे | एमपीएससीच्या वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकीची परीक्षा २१ जुलै रोजी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगातर्फे एकूण 524 रिक्त जागांसाठी ही परीक्षा ६ जुलै रोजी घेतली जाणार होती. सुधारित तारखेनुसार आता ही परीक्षा २१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्‍यात सुधारणा करून आता ही परीक्षा २१ जुलै रोजी होईल. या परीक्षेसाठी घोषित करण्यात आलेल्या जागांमध्येही वाढ करण्यात आली असून, एसईबीसी उमेवारांसाठी अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे, तसेच वयाधिक्यामुळे अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशा उमेदवारांना इतर मागास प्रवर्गातून अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षेच्‍या तारखांत बदल केल्‍याचे एमपीएसीकडून स्‍पष्ट करण्यात आले आहे.