Mumbai Air Pollution : मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली; उच्च न्यायालयाने घेतली दखल

Mumbai Air Pollution – मुंबईतील हवेच्या गुणवत्ता (Mumbai Air Pollution ) निर्देशांकात जी घट नोंदवली गेली आहे त्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) चिंता व्यक्त केली असून याची न्यायालयाने स्वताहून दखल घेत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाला नोटीस पाठवून त्यांच्याकडून या प्रकरणी उत्तर मागवले आहे.

मुंबईत बिघडलेल्या हवाप्रदुषणाच्या स्थितीवर न्यायालयापुढे तीन जनहित याचिकाही दाखल झाल्या आहेत. त्यावरही आज सुनावणी झाली. यावेळी बोलताना मुख्य न्यायाधिश उपाध्याय म्हणाले, “शहरातील हवेचा दर्जा निर्देशांक दिवसेंदिवस खालावत चालला आहे, मुंबईतील एकाही भागात हवेची गुणवत्ता चांगली नाही.

या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या आहेत आणि विद्यमान कायद्यांतर्गत त्यांनी कोणती पावले उचलली पाहिजेत याची माहिती दिली पाहिजे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

याचिकाकर्ते अमर बबन टिके, आनंद झा आणि संजय सुर्वे यांनी त्यांच्या जनहित याचिकेत सरकार आणि महापालिकेला शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी आणि वनीकरणासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.मुंबईत पुरेशा हिरवळीच्या अभावामुळे वायू प्रदूषणाची पातळी वाढत असून, त्याचा रहिवाशांवर, विशेषतः लहान मुलांवर विपरित परिणाम होत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.