मुंबई पोलिसांचा ड्रग्‍ज तस्‍कऱ्यांना दणका ! चौघा आरोपींची तब्‍बल ३ कोटी रुपयांची मालमत्‍ता जप्‍त

मुंबई  – अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात तीन महिन्‍यांपूर्वी अटक केलेल्या १२ जणांपैकी चार जणांना मुंबई पोलिसांनी चांगलाच हिसका दाखविला आहे. या चौघा आरोपींनी कथितरित्या जमवलेली ३ कोटी रुपयांच्‍या मालमत्तेवर पोलिसांनी टाच आणली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

साहिल रमजान अली खान उर्फ मस्सा (27), कायनात साहिल खान (28), सरफराज साबिरली खान उर्फ गोल्डन भुरा (36) आणि प्रियांका अशोक करकौर (24) अशी मालमत्‍ता जप्‍त करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेने दिलेल्‍या माहितीनुसार, मालेगाव येथील फार्महाऊस, ५० तोळे सोने आणि विविध भागातील जमिनीवर जप्तीची कारवाई करण्‍यात आली आहे. सदर मालमत्ता ही अमली पदार्थांच्या अवैध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून खरेदी करण्यात आली होती.

गुप्त माहितीवरून पोलिसांनी ऑगस्टमध्ये मुलुंड चेकपोस्टवर दोन कार अडवून 350 ग्रॅम मेफेड्रोन, 45 ग्रॅम चरस आणि 17 लाख रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला होता. या जप्तीप्रकरणी एकूण 12 जणांना अटक करण्यात आली होती.

अंमली पदार्थांच्या विक्रीच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेला आढळून आले की 12 पैकी चार आरोपींनी अंमली पदार्थांच्या विक्रीतून सुमारे 3 कोटी रुपयांची मालमत्ता आणि सोने खरेदी केले होते. या माहितीच्‍या आधारे मुंबई पोलिसांनी सदर मालमत्‍ता ताब्‍यात घेतली.

दरम्‍यान, गोल्‍डन भुरा आणि अजमल तोतला (४५) हे ड्रग्ज सिंडिकेटचे सूत्रधार आहेत. हे दोघे अनेक वर्षांपासून तस्करांच्या नेटवर्कद्वारे संपूर्ण मुंबईत ड्रग्जचा पुरवठा करत होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.