मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला 15 वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड व लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या झकी-उर-रहमान लखवीला15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लखवीला ही शिक्षा टेरर फंडिंग प्रकरणी पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने सुनावली आहे.

गेल्याच आठवड्यात टेरर फंडिंग प्रकरणी पंजाब प्रांतातील दहशतवाद विरोधी विभागाकडून झकी-उर-रहमान लखवीला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. डिस्पेन्सरीच्या नावावर पैसा जमा करून त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने आज न्यायालयाने त्याला 15 वर्षांची शिक्षा सुनावली.

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये हल्ले झाले होते. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 300 लोक जखमी झाले होते. झकी-उर-रहमान लखवी हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याचा मुंबई पोलीस शोध घेत होती. भारत सरकारने त्याला सप्टेंबर 2019 मध्ये यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित केलं होतं.

तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय स्तरावर झकी-उर-रहमान लखवीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. पण त्याच्यावर पाकिस्तानने अद्याप कारवाई केलेली नव्हती. आता पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यामुळे त्यांनी 2 जानेवारीला त्याला अटक केली आणि खटला चालवला.

Leave a Comment