गावभर कचरा अन् पालिकेच्या ‘पंचतारांकित’वर नजरा

  • मानांकनाचे निकष महिनाभरात कसे पूर्ण करणार?

पुणे – गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे कचरा व्यवस्थापन कोलमडले आहे. त्यामुळे शहरभर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी “पंचतारांकित’ अर्थात फाइव्ह स्टार नामांकन मिळवण्यासाठीचा प्रस्ताव महिला आणि बालकल्याण समितीत ठेवला आहे. या प्रस्तावानुसार महापालिका शहरात 100 टक्के कचरा संकलन आणि प्रक्रिया करणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्वेक्षण जानेवारीत होणार असताना महापालिकेने स्पर्धेची तयारी यंदा डिसेंबरमध्ये केली आहे.

 

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सुरुवातीला पहिल्या दहा शहरांमध्ये असलेली पुणे महापालिका गेल्या दोन ते तीन वर्षांपासून 30 व्या क्रमांकावर गेली आहे. त्यातच महापालिकेस लोटामुक्तीचा दर्जा तसेच शहरांच्या रॅकिंगमध्ये 1 स्टार दर्जाही मिळालेला नव्हता. त्यामुळे महापालिकेने या सर्वेक्षणाची मुदत संपण्याआधी केंद्र शासनाला विनंती करून फेर सर्वेक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर लोटामुक्तीचा दर्जा तसेच तीन स्टार शहराचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर यंदा पालिकेने या सर्वेक्षणासाठी काहीच तयारी केली नसल्याचे चित्र आहे.

 

यंदा डिसेंबरमध्ये “पंचतारांकित’ दर्जासाठी नामांकन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तर, त्यानंतर अवघ्या महिनाभरात या मानांकनाचे निकष महापालिका कसे पूर्ण करणार? असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कचरा व्यवस्थापनाची स्थिती कोलमडली आहे. शहरात बहुतांश ठिकाणी कचरा संकलन थांबले आहे. रस्त्या-रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे पालिकेस कचरा व्यवस्थापन शक्य नसताना; 100 टक्के कचरा व्यवस्थापनाचा दर्जा मिळवण्याचा अट्टाहास का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

पंचतारांकित दर्जाचे प्रमुख निकष

  • घरोघरी जाऊन 100 टक्के कचरा संकलन आणि वर्गीकरण
  • 100 टक्के बंद वाहनातून वाहतूक आणि प्रक्रिया
  • 100 टक्के राडारोडा संकलन आणि प्रक्रिया
  • 100 टक्के पावसाळी नाल्यांची स्वच्छता आणि राडारोडा टाकल्यास कारवाई
  • शहरातील नद्या, नाले, तलाव तसेच जलस्रोत कचरामुक्त ठेवणे
  • शहरात केवळ गरजेच्या ठिकाणी कचरा कंटेनर ठेवणे. इतर कंटेनर कमी करणे

Leave a Comment