मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी; महाराष्ट्रातील ‘या’ खासदारांना आला पंतप्रधान कार्यालयातून फोन

Murlidhar Mohol|  पंतप्रधान पदासाठी नामनिर्देशित नरेंद्र मोदी आज तिसऱ्या आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहे. यासाठी दिल्लीत जय्यत तयारी करण्यात आली आहे.संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. यात राज्यातील काही नेत्यांनीही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

यात राज्यातील भाजपचे नेते नितीन गडकरी, रक्षा खडसे, आरपीआयचे सर्वेसर्वा रामदास आठवले, शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा होती. त्या अनुषंगाने एनडीए सरकारमधील उच्चपदस्थ नेत्यांनी काहींना फोन केल्याचे समोर आले आहे. नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे.  Murlidhar Mohol|

 मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन 

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होणार आहे.  महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. पंतप्रधान कार्यालयातून आज सकाळी मोहोळ यांना संपर्क साधण्यात आला आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातून मोहोळ आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले निवडून आलेले आहेत. पंतप्रधान मोदींचे पुण्याबाबत असलेले विशेष प्रेम लक्षात घेता मोहोळ यांना मंत्रीपदाची लाॅटरी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याबाबतचे वृत्त दै. प्रभातमध्ये सर्वात आधी देण्यात आले होते. दरम्यान, निवडणूक निकालानंतर मोहोळ हे गुरूवारी संध्याकाळी दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर आता त्यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली आहे. Murlidhar Mohol|

नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद मोहोळ यांचा राजकीय प्रवास 

मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले आहेत. त्यानंतर त्यांना थेट मंत्रीपद मिळाले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. पुणे लोकसभा मतदारसंघातून तब्बल १ लाख २३ हजारांच्या मताधिक्याने मोहोळ निवडून आले. आता मोहोळ यांची नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी कारकीर्द राहणार आहे.