पुणे-मुंबई द्रुतगतीवर अपघाताचा बनाव करून तरुणाचा खून

  • लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तासाभरात आरोपीला केले जेरबंद

पवनानगर – पुणे-मुंबई द्रुतगतीवर अपघाताचा बनाव करून एकाचा खून करून पळालेल्या इसमाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एक तासात सापळा लावत अटक केली. शुक्रवारी (दि. 19) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सतीश ओझरकर (रा. ओझर्डे, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रामदास भिमराव ओझरकर (रा. ओझर्डे, पवनानगर, ता. मावळ) असे या आरोपीचे नाव आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगतीवर अपघात झाल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर ग्रामीणचे पथक तात्काळ धाव घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेथे पाहणी केली असता या ठिकाणी एक इसम निपचित पडलेला दिसला. तेव्हा या अपघाताबाबत संशय आल्याने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता एका इसमाने मागून धडक देऊन तो इसम त्याची मोटार घेऊन लोणावळ्याच्या दिशेला गेल्याची माहिती समजली.

या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नाकाबंदीमध्ये रामदास भिमराव ओझरकर याची मोटार समोरून धडकले दिसून आल्याने ही मोटार थांबवून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

ओझर्डे येथील मयत सतीश ओझरकर हा त्याच्या दुचाकीवर पुणे-मुंबई द्रुतगतीवरून लोणावळाच्या दिशेने जात होता. रामदास ओझरकर याने जुन्या भांडणाचे कारणावरून सतीशच्या दुचाकीला मोटारीची मागून जीवे मारण्याच्या उद्देशाने जोरात धडक दिली. तेव्हा मयत सतीश हा खाली पडल्यावर त्याने गाडीतून खाली उतरून त्याचे हातातील लोखंडी रॉडने सतीश ओझरकर याचे डोक्‍यात, अंगावरती मारून त्यास जीवे ठार मारले असल्याचे सांगितले.

आरोपी रामदास व मयत सतीश ओझरकर यांच्यात काल गावात भांडणं झाली होती. या भांडणांतून रामदासने सतीशच्या अपघाताचा बनाव बनवून त्याला मारण्याचा प्लॅन केल्याची कबुली दिली असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार युवराज बनसोडे, शकील शेख, पोलीस नाईक देविदास चाकणे, मयूर अबनावे, पोलीस शिपाई हणमंत शिंदे, ऋषिकेश पंचरास, स्वप्नील पाटील, शिधेश्‍वर शिंदे, मच्छिंद्र पानसरे यांच्या पथकाने एक तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेत अटक केली.

Leave a Comment