अंडरवर्ल्डशी माझे संबंध… तुझा अजय भोसले करील..; अग्रवाल पिता-पुत्राविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे – अंडरवर्डशी माझे डायरेक्ट संबंध आहेत, पोलीस मी खिशात घेऊन फिरतो, तुझा अजय भोसले करीन, त्याला जसा ठोकला तसा तुला ठोकीन, तो वाचला पण तू वाचणार नाही अशी धमकी देत इस्टेट एजंटची १ कोटी ३२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अग्रवाल पिता-पुत्रांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अडचणीत आलेल्या अग्रवाल पिता-पुत्रांवर कारवाईचा फास चांगलाच आवळला गेला आहे. पोलिसांनी एका पाठोपाठ अग्रवाल कुटूंबावर गुन्हे दाखल करत एक प्रकारे अग्रवाल कुटूंबाची नशाच उतरवली आहे.

याबाबत मुश्ताक शब्बीर मोमीन (४५ रा. कौसरबाग कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सुरेंद्रकुमार ब्रम्हदत्त अग्रवाल (७७), बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (५०), जसप्रीतसिंग राजपाल यांच्यावर भादंवि ४२०, ४०६, ५०४, ५०६, १२०(बी), ३९२ ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी मुश्ताक मोमीनची एम. एम असोसिएटस व वास्तू प्रॉपर्टीज या नावाची इस्टेट एजंसी आहे. पुणे आणि बाहेरच्या शहरात प्लॉट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंटच्या संदर्भातील परवाने मिळवून देण्याचे काम ते करतात. सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि जसप्रीतसिंग राजपाल यांचे कोंढव्यातील ब्रम्हा काउन्टच्या मागे असणाऱ्या जागेवरून निवृत्ती कोपरे यांच्याशी वाद होते.

दरम्यान आरोपींची फिर्यादी शेख यांना जुलै २०१९ मध्ये भेटून जागेचा वाद मिटवून देणार का? अशी विचारणा केली होती. यानंतर फिर्यादी यांनी परवान्याचे कामे करून जागेवरील वाद मिटवून देतो असे सांगितले. यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याशी वाटाघाटी करत जागेची वाद विवाद सोडवून दिल्यास तसेच जागे संदर्भातील काही कामे करून दिल्यास १ कोटी ५० लाखाचे मानधन देण्याचा करार केला होता.