nagar | प्रचार खर्चाचा दर निश्चित : निवडणूक विभाग ठेवणार खर्चावर वॅच

नगर,(प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने प्रचार खर्चाच्या साहित्याचे अंतिम दर निश्‍चित केले आहेत. तत्पूर्वी प्रारूपदराची यादी तयार करून त्यावर राजकीय पक्षाकडून हरकती घेण्यात आल्या. आलेल्या हरकतीनूसार प्रचार खर्चाची यादी अंतिम करण्यात आली आहे.

यात मासांहारी जेवणासह, बिर्याणी प्लेटचे दर कमी करण्यात आलेले आहेत. तर प्रचार काळात देण्यात येणार्‍या चहा, पाण्याची बाटली, पाण्याचा जार यांचे दर पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आले आहेत. तसेच वडपाव, समोसा (प्रत्येकी १ नग), पावभाजी एक प्लेट याचे दर कपात करण्यात आले आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी चहाच्या एका कपासाठी उमदेवारला १० रुपये, पाण्याची बाटली १७ रुपये, पाण्याचा जारसाठी ४० रुपये, वडापावसाठी २० रुपये, सामोसा (एक नग) १५ रुपये, शाकाहारी जेवण (साधे) ११५ रुपये, विशेष शाकाहारी जेवण १८० रुपये, मांसाहारी जेवण २४० रुपये, बिर्याणी प्लेट १५० रुपये आकारले जाणार आहेत. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी या दरांना मान्यता दिली असून जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखाधिकारी शैलेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या समितीने हे दर निश्‍चत केले आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून १६ मार्चला जाहीर झाला होता. यावेळी लढवणार्‍या उमेदवाराला ९५ लाखांची खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत ही मर्यादा ७० लाख होती. राजकीय पक्ष व उमेदवारांकडून प्रचारासाठी जे साहित्य वापरले जाणार आहेत, त्याची दरसुची निश्‍चित करण्यात आली आहे.

व्यासपीठ (प्रति चौ. फू.) मंडप, नेट, स्वागत गेट मोठे, खुर्ची, कुशन खुर्ची, फिरती खुर्ची, मॅट्रेस बेडशीटसह व लोड, टेबल, कापडी कानात, ताडपत्री, व्हीआयपी टीपॉय, साधा टीपॉय, जनरेटर इंधनसह, ध्वनीक्षेपक, माईक ऍम्प्लिफायर प्रतितास, ट्यूबलाइट, हॅलोजन, फॅन यांचे अंतिम दर देखील या सुचित निश्‍चित करण्यात आले आहेत.

खाद्यपदार्थ
कॉफी १५ रुपये, आईस्क्रीम (लहान कप) १० रुपये, मोठा कप २० रुपये शीतपेय १५ रुपये, लाडू-चिवडा पाकीट (100 ग्रॅम) ३० रुपये, पोहे २० रु., डोसा-उत्तप्पा ५० रु., मिसळ पाव-भाजीपाव ६० रुपये साबुदाणा खिचडी-वडा प्लेट २० रुपये असे निश्‍चित करण्यात आले आहे.

वाहने (एक दिवस, इंधनासह) अंतिम
रिक्षा १ हजार २०० रुपये. काळी पिवळी टॅक्सी ते जीप, ट्रॅक्स, बोलेरो, टाटा सुमो, लोगान तवेरा ३ हजार ते ३ हजार ३००, टाटा विस्क्टा, टाटा इंडिका, इंडिगो, अल्टो ३ हजार रुपये, इनोव्हा झायलो ४ हजार ९०० व ५ हजार ६१० रु., टेम्पो ट्रॅव्हलर (२० प्रवासी) ते बस ४५ प्रवासीपर्यंत वेगवेगळ्या व्यक्ती मर्यादेनूसार ५ हजार ५०० ते १० हजार ४०० रुपये प्रती दिन ठरवण्यात आले आहेत.

व्हीआयपी बुके ३५० रुपये
बुके १०० रुपये, व्हीआयपी बुके ३५० रुपये, फुलांचा हार ३० ते ८० रुपये, सफारी अडीच फूट हार १ हजार रुपये. मोठा ७ ते ९ फूट हार ५ हजार रुपये, स्टेज डेकोरेशन (प्रती चौरस फूट) १५० रुपये, फटाक्यांची १ हजारची माळ ७५० रु., फॅन्सी फटाके (२५ बार) १ हजार १०० रुपये असे आहेत.

स्टेशनरी साहित्याचे असे असतील दर
बॉल पेन ५ रुपयं, जेल पेन ५ रुपये, करेक्शन पेन १० रुपये परमनंट मार्कर २० रुपये, स्केच पेन सिंग्न २५ रुपये, स्केच पेन कलरफुल ३० रुपये, मोठा ४५ रुपये, डिंक बाटली ३५ रुपये, झेरॉक्स, फ्लेक्स, स्टिकर, कापडी झेंडे यासह अन्य लेखन साहित्यांचे दर निश्‍चित करण्यात आलेले आहेत.

मंगलकार्यालयासाठी मोजावे लागणार ५० हजार रुपये
मंगल कार्यालय ५० हजार रुपये प्रती दिन, हॉटेलमधील विविध प्रकारातील एक रुम ९९९ ते ७ हजार रुपये प्रती दिन, दुचाकी इंधनासह ३५०ते ७०० रुपये प्रती दिन, व्हीडीओग्राफी १ हजार ३८९, एलईडी १० हजार १२५, कॅमेरा क्रेनसह (32 फुट) १३ हजार २५० रुपये असे दर निश्‍चित करण्यात आले आहेत.