नगर – शासकीय रूग्णालयाच्या आवारात टोळक्याकडून मारहाण

नगर – जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या पार्किंगमध्येच सात जणांच्या टोळक्याने येथील बाप-लेकासह पुतण्याला लाकडी दांडके, चाकूने मारहाण केली. बुधवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी शरद दिगंबर शिंदे (वय ५५ रा. भोसले आखाडा, बुरूडगाव रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश ससाणे, विजू पठारे (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. सिध्दार्थनगर) व इतर पाच अनोळखी इसम यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी फिर्यादी व त्यांचा पुतण्या रोहित व मुलगा सोनू जिल्हा शासकीय रूग्णालयात फिर्यादीच्या चुलतीचा मृत्यू दाखला काढण्यासाठी आले होते. त्यावेळी निलेश ससाणे याने त्याची दुचाकी जोरात चालवून फिर्यादी जवळ थांबवली. फिर्यादीने त्याला विचारले असता त्याचा राग मनात धरून त्याने हातातील चाकूने मुलगा सोनूवर वार करून त्याला जखमी केले.

तसेच इतर पाच अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांच्या पुतण्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. विजू पठारे याने फिर्यादीला मारहाण करून मुलगा सोनू याला,‘तु जास्त नाटके केले तर तुला जिवंत मारून टाकीन’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमींवर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले व त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.