नगर | शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी विकास नवाळे

शेवगाव, (प्रतिनिधी) – शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावरून सचिन राऊत यांची फेब्रुवारीमध्ये बदली झाल्याने रिक्त झालेल्या मुख्याधिकारीपदी विकास नवाळे यांची नियुक्ती झाली. त्यांनी गुरुवारी (दि.७ ) पदभार स्वीकारला आहे.

नगरपरिषदेच्या विभाग प्रमुखांनी मुख्याधिकारी नवाळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पदभार स्वीकारताच मुख्याधिकारी नवाळे यांनी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन ओळख करून घेतली. नगरपरिषदेच्यावतीने सुरूअसलेल्या विकासकामांची माहिती घेतली. शहरातील विकास आराखड्यासंदर्भात चर्चा केली.

शेवगावात विविध प्रलंबित प्रश्न आहेत. नवीन प्रशस्त इमारत उभारणी करणे, शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करणे तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेला गती देणे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे व शहर स्वच्छ ठेवणे, दुरावस्थेत असलेल्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करणे, बाल उद्यान उभारणे,

शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करणे, वाढलेले अतिक्रमण काढण, नगरपरिषदेचे मालकीचे ओपन प्लेस व गाळे पालिकेच्या ताब्यात घेणे ,नगरपरिषदेतील गैर कारभाराला लगाम घालणे ,अशी विविध आव्हाने नगर परिषदेसमोर आहेत. या आव्हानांन ते कशा पध्दतीने सामोरे जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.