नगर : तहसीलदारांना पाच वर्षांनी मिळाले हक्काचे वाहन

पालकमंत्र्यांच्या हस्ते नवीन वाहनांचे वितरण
राहुरी –
गेल्या पाच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राहुरीच्या तहसीलदारांना आता हक्काचे वाहन मिळाले असून नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात हे वाहन वितरित करण्यात आले.

महसुल विभागातील प्रांताधिकारी व तहसिलदारांना नव्याने मंजूर झालेल्या वाहनांचे वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हाधिकारी सालीमठ, पोलीस अधीक्षक ओला उपस्थित होते. शासनाकडून प्राप्त झालेल्या 9 वाहनांचे उपविभागीय अधिकारी, अहमदनगर, कर्जत तसेच तहसिलदार, पाथर्डी, शेवगाव, अहमदनगर, कोपरगाव, संगमनेर, जामखेड व राहुरी यांना पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.

तत्कालीन तहसीलदार असलेले फसीयोद्दीन शेख यांच्या कालावधीत वाहन मुदत संपल्याने परिवहन विभागाने सदर वाहन निर्लेखित केले होते. पूर्वी तहसीलदारांना सन 2006 मध्ये टाटा सुमो हे सरकारी वाहन मिळाले होते. सन 2019 पर्यंत ते वाहन सेवेत होते. दहा वर्षांनंतर शासकीय वाहन निर्लेखित होत असते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून तहसीलदारांचे दौरे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिग्रहित केलेल्या वाहनातूनच सुरू होते.

अधिग्रहित केलेल्या वाहनावरच महसूलची गरज भागवली जात होती. भौगोलिक व महसूलदृष्ट्‌या राहुरी तालुक्‍याचे कार्यक्षेत्र मोठे असून 83 ग्रामपंचायती आहेत. अवैध गौण खनिज गस्त अनुषंगाने तसेच तालुक्‍याच्या शेतकरी बांधवांचे क्षेत्रीय कामकाजासाठी तहसीलदारांना थेट शेतकऱ्याचे बांधपर्यंत जावे लागते. त्यामुळे वाहनाची आवश्‍यकता होती. यापूर्वीचे तहसीलदार शेख यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील वाहन वापरले, परंतु आता सुमारे 8 महिन्यांपूर्वी राहुरी येथे रुजू झालेले तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना नवीन वाहनाचा वापर करता येणार आहे.