T20 WorldCup | आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंकेला चक्क नामिबियाने नमवले

T20 WorldCup – टी-२० विश्वचषकच्या पात्रता फेरीतील पहिल्याच सामन्यात नामिबियाने मोठा उलटफेर केला. काही दिवसांपूर्वीच भारत आणि पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघांचा पराभव करत  श्रीलंकेच्या संघाने आशिया चषक जिंकला होता. त्याच श्रीलंकन संघाला नामिबियाने तब्बल ५५ धावांनी पराभवाचे तोंड दाखवले आहे. या सामन्यात श्रीलंकन कर्णधार दशुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून १६३ धावा केल्या.

#WomenAsiaCup | ३ षटकांत ५ धावा अन् ३ विकेट्स; रेणुका ठरली भारताच्या विजयाची शिल्पकार…

प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १९ षटके खेळून अवघ्या १०८ धावांवरच सर्वबाद झाला. या सामन्यात नामिबिया संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीतही दमदार कामगिरी केली. नामिबियासाठी फलंदाजीत जॉन फ्रायलिंकने सर्वाधिक २८ चेंडूत ४४ धावांची शानदार खेळी खेळली. तसेच जेजे स्मितने फटकेबाजी करत ३६ धावांचे योगदान दिले. नामिबिया संघ फलंदाजी करत असताना एकवेळ शंभर धावांमध्येच निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र फ्रायलिंक आणि स्मितने दमदार फलंदाजी कौशल्य दाखवत संघाला एका मजबूत धावसंख्येवर पोहोचवले.

श्रीलंकेच्या संघाने आगोदर गोलंदाजी करताना शेवटच्या ५ षटकांमध्ये अत्यंत बेजबाबदारपणे गोलंदाजी केली. त्यामुळेच कमी धावांवरच बाद होईल असे वाटणारा नामिबिया संघ १६३ धावांपर्यंत गेला. श्रीलंकेच्या फलंदाजांनाही खास कामगीरी करता आली नाही. लंकेचा कोणताही फलंदाज नामिबियाच्या गोलंदाजांवर दडपण निर्माण करू शकला नाही. त्यामुळेच नामिबिया संघाने या सामन्यात सहज विजय मिळवला.

त्याचबरोबर या स्पर्धेच्या ( T20 WorldCup ) पात्रता फेरीतील दुसरा सामना नेदरलँड आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात खेळला जात आहे. युएई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून ११८ धाव केल्या आहेत.