नांदणी नदीपात्र भरले तुडुंब

जामखेड – जामखेड तालुक्‍यातील जवळा येथे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलक्रांती घडण्याचे काम झाले आहे. गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने जवळा परिसरातील नांदणी नदीवरील सर्व बंधारे ओव्हर फ्लो झाल्याने गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच यावर्षी नदीपात्र दुथडी भरलेले दिसत आहे.

राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची ही किमया साधली गेली आहे. तीन वर्षांपूर्वी नांदणी नदीचे पात्र नेमके कुठे आहे, असा प्रश्र पडावा, अशी नदीपात्राची अवस्था झालेली होती. संपूर्ण नदीपात्र गाळाने भरलेले. त्यातच बेसुमार वेड्या बाभळी वाढल्याने नदीपात्राचे अस्तित्व राहिलेले नव्हते. अशा परिस्थितीत थोडा जरी पाऊस आला, तरी पाणी नदीपात्राबाहेर जाऊन पूर परस्थिती निर्माण व्हायची. विशेष म्हणजे पाणी अडविण्यासाठी नदीवर बंधारे नसल्याने पावसाचे पाणी आले असे पुढे सीना नदीला जायचे. त्याचा जवळा परिसराला म्हणावा असा फायदा होत नव्हता.

राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली आणि नांदणी नदीचे एकप्रकारे पुनरुज्जीवनच झाले. प्रत्यक्ष नदीपात्र तब्बल 55 मीटर रुंदीचे असताना मोठ्या प्रमाणातील गाळ आणि वेड्या बाभळींमुळे नदीला एखाद्या ओढ्याचे स्वरूप आले होते. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामास तब्बल 20 लाखांचा निधी दिला.

या निधीतून नदीपात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. यावरच पालकमंत्री शिंदे थांबले नाहीत, तर त्यांनी जवळा परिसरात नांदणी नदीवर साधारण 500 मीटर अंतरावर बंधारे बांधण्यासाठी तब्बल साडेतीन कोटींचा निधी दिला. त्यातून नदीवर 11 बंधारे बांधण्यात आले. नदीपात्र रुंदीकरणाबरोबरच बंधाऱ्यांचीही कामे झाल्यामुळे नांदणी नदीला मुळस्वरूप प्राप्त झाले.

योगायोगाने सन 2016 मध्येच चांगला पाऊस झाल्याने, जवळा परिसरातील साधारण आठ किलोमीटरचे नदीपात्र तुडुंब पाण्याने भरले आहे. त्यानंतर सन 2017 मध्येही चांगला पाऊस झाल्याने जवळा परिसरात सर्वाधिक उसाचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर दुग्धोत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले. गेल्या 50 वर्षांत प्रथमच जमिनीची पाणी पातळी वाढली. त्यामुळे शेतकरी सुखावला.

दरम्यान गेल्यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने त्याचा विपरित परिणाम दिसून आला. पाण्याअभावी ऊस जळाला, तर गेल्यावर्षी खरीप हंगामासह रब्बी हंगामही संपूर्ण वाया गेला. यावर्षीही पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. मात्र गेल्या महिनाभरात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या असून, रब्बी पिकाची शेतकऱ्यांना आशा आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नांदणी नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करतानाच मोठ्या स्वरूपात बंधारे बांधल्याने जवळा परिसरात पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे परिसरात एकप्रकारे जलक्रांती झाली आहे.

राजेंद्र महाजन शेतकरी, जवळा 

Leave a Comment