नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत यश

नांदेड : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव (ता. नांदेड ) येथील विद्यार्थिनी आरोही श्रीराम मोगले हिने सिंधुदुर्ग येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत १३ वा क्रमांक मिळवून कौतुकास्पद यश संपादन केले आहे.

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट अक्वेटिक असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 12व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा मालवण येथे संपन्न झाल्या. या जलतरण स्पर्धेत विविध वयोगटामध्ये 500 मीटरपासून ते 5 किमीपर्यंत झालेल्या स्पर्धेत राज्यातून विविध वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव (ता. नांदेड) या शाळेतील सहशिक्षक श्रीराम मोगले यांची त्याच शाळेत इयत्ता चौथीत शिकत असलेली मुलगी कु. आरोही श्रीराम मोगले हिने 8 वर्ष ते 10 वर्ष या गटातील मुलींच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

आरोहीने 1 किमी अंतर 14 मिनिटांमध्ये पूर्ण करून पहिल्याच प्रयत्नात 13 वा क्रमांक मिळवला आहे. संयोजकांनी आरोहीला मेडल आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. या यशाबद्दल वाजेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी आरोही आणि तिचे वडील उपक्रमशील शिक्षक श्रीराम मोगले यांचे अभिनंदन करून हा वाजेगाव शिक्षण विभागाचा गौरव आहे, आरोही भविष्यात नक्कीच उत्कृष्ट जलतरणपटू होईल या शब्दात आपला आनंद व्यक्त केला.

शालेय विद्यार्थ्यांना जलतरण स्पर्धेत सहाव्या इयत्तेपासून सहभाग घेता येतो, अन्यथा आरोहीने निश्चितच शालेय स्पर्धेतही अभिमानास्पद यश मिळवले असते. आरोहीच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख रामेश्वर आळंदे, केंद्रीय मुख्याध्यापक बाबुराव जाधव आणि प्रा.शा. वडगाव येथील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.