कलंदर: नारद उवाच…

उत्तम पिंगळे

(देवराज इंद्र एकटेच सिंहासनावर बसलेले आहे. इतक्‍यात देवर्षी नारद यांचे आगमन होते)
देवर्षी: नारायण… नारायण…
देवराज: या… या मुनिवर्य. मी एकेक दिवस विचारच करत होतो की आपले प्रत्यक्ष आगमन स्वर्ग लोकी होण्यास विलंब का होत आहे?
देवर्षी: नारायण… नारायण…मी पृथ्वीतलावर जंबुकद्वीपावर गेलो होतो. पृथ्वीतलावर जास्त देवादिकांचा गजर जम्बुकद्वीपावरच होत असतो. तेथे महाकुंभमेळा कसा साजरा होत आहे ते पाहण्याकरिता गेलो होतो.
देवराज: बरोबर आहे. मग कसे काय सर्व पार पडले तेथे?
देवर्षी: याच नेत्री मी अनादी काळापासून केला जाणारा कुंभमेळा प्रत्यक्ष पाहून आलो. तेथील उत्तर विभागातील सुभेदाराने जातीने लक्ष घालून अत्यंत चोख व संपन्न अशी व्यवस्था केली होती. सामान्य जनतेसाठीही गंगेच्या विविध घाटांवर चोख व्यवस्था केली होती. सर्वत्र देवगणांचा जयजयकार, शाहीस्नान, उपवास, होमहवन, अभिषेक वातावरण अगदी देवमय होऊन गेले होते.
देवराज: वा… वा… अतिसुंदर आपण याची डोळा तो सोहळा साठवला आहे. परंतु मी एक विचार करत होतो की, मकर संक्रांतीला सुरू झालेला कुंभमेळा महाशिवरात्रीला संपन्न झाला. मग त्यानंतर इतके दिवस आपण कुठे होता? महाशिवरात्री नंतर स्वर्गलोकी येण्यास एवढा विलंब का बरे झाला?
देवर्षी: नारायण… नारायण… आपण जे म्हणत आहात ते अगदी योग्यच आहे. कारण कुंभमेळा संपन्न झाल्यावर त्या जंबुकद्वीपावर निवडणूक नावाचा एक प्रकार घोषित झाला म्हणून मी काही दिवस तेथे थांबून राहिलो.
देवराज: निवडणूक! म्हणजे काय?
देवर्षी : नारायण… नारायण… निवडणूक म्हणजे त्या जम्बुकद्वीपावर लोकांनी लोकांसाठी लोकांचे असे राज्य बनवलेले असते. दर पाच वर्षांनी निवडणूक होऊन जम्बुकद्वीपाचा प्रमुख बदललाही जाऊ शकतो.
देवराज: असं आहे होय?
देवर्षी: नारायण… नारायण… आपल्याकडे तशी देवशाही आली तर आपलेही आसन कायमचे राहणार नाही.
देवराज: थांबा देवर्षी जरा हळू बोला. मग पुढे काय झाले?
देवर्षी: नारायण… नारायण… तसे लोकांचे वेगवेगळे गट आहेत. त्यांना पक्ष म्हणतात. मग असे काही पक्ष एका बाजूला व काही दुसऱ्या बाजूला. काही कुठेच नाही असे निवडणुकीत लढतात. सर्वच पक्षांचे नेते गंगेच्या विविध घाटांवर येऊन पूजाअर्चा, महायज्ञ करू लागले आहेत. निवडणुकीसाठी त्यांना देवलोकांचा आशीर्वाद असावा म्हणून हे सारे करत आहेत.
देवराज: अरे बाबा हे तर खूपच सुंदर आहे निवडणुकीच्या निमित्ताने ते आपली पूजाअर्चा करू लागले आहेत त्यामुळे चांगले वाटले.
देवर्षी: नारायण… नारायण… पण खरे सांगू हा सगळा दिखावा आहे. जनता या देखाव्याला बघून त्यांना मते देईल असे त्यांना वाटत आहे. ज्या पक्षाला किंवा गटांना अर्ध्याहून अधिक जागा मिळतील त्यांच्याच नेता जम्बुकद्वीपाचा पंतप्रधान म्हणजे मुख्य वा आपल्या भाषेत राजा होतो. पुन्हा पृथ्वीतलावर जाऊन येणार आहे.
देवराज: अवश्‍य, आपण पुन्हा जावे. पण या स्वर्गलोकी लोकशाही सम देवशाही असावी, असा कृपया प्रचार मात्र करू नये. (नारदमुनी हसत हसत नारायण… नारायण…)

Leave a Comment