ब्रिटनच्या पंतप्रधानपदी जावई ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर नारायण मूर्तींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,“आम्हाला विश्वास आहे कि…”

नवी दिल्ली : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांच्या रुपाने  प्रथमच भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान होणार आहे. सोमवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी सुनक यांची निवड झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला आहे. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत, शिवाय ते माजी अर्थमंत्रीही असल्याने ब्रिटनला आर्थिक संकटामधून बाहेर काढण्यात ते यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर त्यांचे सासरे आणि आयटी क्षेत्रातील दिग्गद आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. नारायण मूर्ती यांनी यासंदर्भातील प्रतिक्रिया देताना,“अभिनंदन ऋषी! आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्याला फार यश मिळो अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. आम्हाला विश्वास आहे की तो युनायटेड किंग्डममधील लोकांच्या भल्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करेल,” असे मूर्ती यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी मॉरडाँट आणि ऋषी सुनक यांच्यात शर्यत होती. हुजूर पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी सुनक यांना १४२ जणांनी पाठिंबा दिला होता, तर मॉरडाँट यांच्याकडे २९ सदस्यांचे पाठबळ होते. नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात येताच मॉरडाँट यांनी माघार घेतली आणि हुजूर पक्षाचे नवे नेते म्हणून सुनक यांची बिनविरोध निवड झाली. सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या सासऱ्यांनी आम्हाला जावयाचा अभिमान वाटतो असे म्हटले आहे.

सिलिकॉन व्हॅलीतील शिक्षण केंद्रांपैकी एक असणाऱ्या स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये पहिल्यांदा ऋषी आणि मूर्ती यांची मुलगी अक्षता यांची भेट झाली होती. एमबीएचं शिक्षण घेताना ऋषी आणि अक्षता दोघे पहिल्यांदा भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ऋषी आणि अक्षता यांनी २००६ मध्ये बंगळुरु येथे दोन दिवसांच्या समारंभामध्ये लग्नगाठ बांढली. ऋषी यांचा जन्म अमेरिकेतील साऊथहॅम्टन येथील असला तरी त्यांचे पालक भारतीय वंशाचे आहेत.