‘संपूर्ण देशात आणि जगात मोदी गॅरंटीची चर्चा’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi – आज सगळ्या देशात आणि जगातही मोदी गॅरंटीची चर्चा आहे व हरियाणातील रेवाडी हे तर मोदी गॅरंटीचे पहिले साक्षीदार आहे. येथेच पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून काही गॅरंटी दिल्या होत्या.

जगात भारताची प्रतिष्ठा वाढावी अशी देशाची इच्छा होती. ते आम्हीकरून दाखवले. आज येथे एम्सची पायाभरणी होते आहे आणि त्याचे उदघाटनही आम्हीच करणार आहे. एम्समुळे तुम्हाला चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील आणि युवकांना डॉक्टर होण्याची संधी मिळेल.

रोजगार आणि स्वयंरोजगाराच्याही अनेक संधी निर्माण होतील असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हरियाणातील रेवाडी येथील एम्सची पायाभरणी आणि अन्य दहा हजार कोटींच्या विविध विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण आज मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.

अबक बार ४०० पार या आपल्या घोषणेचाही त्यांनी पुन्हा उल्लेख केला. १० हजार कोटीच्या विकासकामांचे लोकापर्ण करण्याची संधी आपल्याला मिळाल्याचे नमूद करत ते म्हणाले की प्रभू श्रीरामाची कृपा अशी आहे की अशा पवित्र कामात जोडले जाण्याचे भाग्य मला लाभते.

भारत विकसित होण्यासाठी हरियाणाही विकसित होणे गरजेचे आहे. जेंव्हा येथे चांगले रस्ते होतील तेंव्हाच हरियाणाचा विकास होईल. रेल्वेचे नेटवर्क, चांगली मोठी रूग्णालये तयार झाल्यावर राज्याचा विकास होईल.

२०१३ मध्ये मला जेंव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्यात आले होते तेंव्हा माझा पहिला कार्यक्रम रेवाडी येथे झाला होता. त्यावेळी रेवाडीच्या जनतेने मला २७२ पारचा आशीर्वाद दिला होता.

तुमचा आशीर्वाद खरा ठरला. आता लोक म्हणत आहेत की मी पुन्हा रेवाडीला आलो आहे आणि यावेळी तुमचा आशीर्वाद आहे अबकी बार ४०० पार. कॉंग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की केवळ एकाच कुटुंबाच्या मोहात अडकलेली कॉंग्रेस आज इतिहासातील आपल्या सगळ्यांत दयनीय अवस्थेतून जाते आहे.

यांच्या नेत्याकडून स्वत:चे एक स्टार्टअप सांभाळले जात नाही आणि हे देश सांभाळण्याची स्वप्ने पाहत आहेत. कॉंग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की देशातील निम्मेपेक्षा जास्त जनतेला आपल्या गरजेच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून लांब ठेवले आणि त्याकरता त्यांना अगतिक करून टाकले. घोटाळे, सेना आणि सैन्याला कमकुवत करण्याचा देशहितापेक्षा एका कुटुंबाचे हित सगळ्यात वर ठेवण्याचाही यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.