नाशिकमध्ये दुर्दैवी घटना! फलंदाजी करताना हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ खेळाडूचा मृत्यू

नाशिक – क्रिकेट खेळत असताना फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक शहरात घडली. सुरेश करवा असे दुर्दैवी मृत्यू पावलेल्या खेळाडूचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे.

शहरातील इंदिरानगर परिसरात क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्व जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरले असता, जेष्ठ खेळाडूचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे आयोजित क्रीडा स्पर्धा काही काळ स्थगित करण्यात आल्या. त्यानंतर करवा यांच्या स्मरणार्थ पारितोषिके देण्याचे एकमताने ठरविण्यात आले. त्यानंतर क्रीडा स्पर्धा सुरु झाली.

खेलो इंडियाच्या पार्श्वभूमीवर श्री प्रतिष्ठान व काळी धर्मराज बडोदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. करवा हे फलंदाजीसाठी मैदानात उभे असताना अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तीव्र हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अचानक झालेल्या घटनेने जेष्ठ नागरिक व प्रेक्षक स्तब्ध झाले. क्रीडा महोत्सवाचे आयोजक माजी नगरसेवक ऍड. शाम बडोदे यांनी क्रीडा महोत्सव स्थगित केल्यानंतर शोकसभा घेण्यात आली. त्यावेळी करवा यांच्या स्मरणार्थ क्रीडास्पर्धा आयोजित करून त्यांच्या स्मरणार्थ बक्षीस देण्यात यावी, अशी मागणी सर्व खेळाडू जेष्ठाकडून करण्यात आली.