भलत्या धाडसाने घेतला जीव! पुराच्या पाण्यात विद्यार्थीनी स्कुटीसह गेली वाहून; तालुक्यात हळहळ

नाशिक – पुलावर पाणी असताना त्यातून स्कुटी चालवल्याने विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला आहे. तन्वी विजय गायकवाड (निफाड) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

निफाड येथील मुळ रविवासी असणारी तन्वी शिक्षणासाठी शिवडी येथे मामाच्या घरी राहत होती. ती कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत होती. तन्वीचे वडील विजय गायकवाड हे देखील त्याच महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करतात. स्कुटीवरून ये-जा करत तन्वी शिक्षण घेत होती.

दोन दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. सोमवारी सकाळी सात वाजता तन्वी उगाव-खेडे या दरम्यान असलेल्या पुलावरून जात होती. पुलावरून पाणी वाहत होते. मात्र पुरस्थितीचे गांभीर्य आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तन्वीने आपली स्कुटी पाण्यात घातली. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तोल जाऊन स्कुटी पुलावरून वाहत्या पाण्यात आली.

परिसरातील नागरिकांनी तीला वाचवण्याचा खुप प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. मृतदेह वाहत जाऊन संत जनार्दन आश्रमशाळेजवळ सापडला. निफाड उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केली असता तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.