नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना आजपासून NMMT बससेवा मोफत; निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत

नवी मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाने प्रवास करणाऱ्या 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास देण्याची घोषणा केली. त्यानंतर एसटी महामंडळाने महिलांना अर्ध्या तिकीटात एसटी प्रवास करणार असल्याचेही जाहीर केले. ज्यानंतर एसटीने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. आता नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट दिली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (NMMT) बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. ही सेवा आज म्हणजे 13 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने तसे जाहीर करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक दिलासा मिळालेला पाहायला मिळत आहे. दिवाळीमध्ये जेष्ठ नागरिकांना मिळालेले हे अनोखे गिफ्ट असून प्रत्येक जेष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमधून मोफत प्रवास करता येईल असे सांगितले होते.

आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चाही केली. त्यानंतर आता नवी मुंबई महानगर पालिका आयुक्तांनी आता एनएमएमटीच्या बसेसमधून 65 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (NMMT) 74 मार्गांवर 567 बसेस चालविल्या जातात. त्यातून दररोज 1.80 लाख प्रवासी रोज प्रवास करीत असतात. NMMT उपक्रम मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, खोपोली, कर्जत, रसानी आणि उरण या NMMC हद्दीतील आणि बाहेरील भागांना जोडणारे 75बस मार्गांचा विस्तार करतो. या सेवेमध्ये 4 सामान्य आणि 32 वातानुकूलित बसेसचा समावेश आहे. नवी मुंबई महापालिका 65 वर्षांवरील नागरिक आणि विद्यार्थ्यांना पन्नास टक्के मोफत प्रवास देते. मात्र आता 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे.