नवनीत राणांची अखेर भायखळा कारागृहातून सुटका; आता लिलावतीत रुग्णालयात दाखल

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली झालेल्या अटकेनंतर त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. आज नवनीत राणा यांची भायखळा कारागृहातून सुटका झाली. राणा दाम्पत्य मागील १२ दिवसांपासून कारागृहात होतं. कारागृहातून सुटका होताच नवनीत राणा यांना प्रकृती खालावल्याने लिलावती रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.

नवनीत राणा यांनी कारागृहगातून सुटका झाल्यानंतर माध्यामांना प्रतिक्रिया देण्याचे टाळले. यावेळी त्यांनी केवळ हात जोडून नमस्कार केला. न्यायालयाने घातलेल्या अटीमुळे त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा हे तळोजा कारागृहात आहेत. त्यांच्या सुटकेची प्रक्रिया अद्याप सुरुच आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री घरासमोर हनुमान चालिसा पठण कऱण्याचा हट्ट राणा दाम्पत्याने धरला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांनी या कृतीमुळे न्यायालयाने देखील फटकारलं होतं. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने न्यायाधीश राहुल रोकडे यांनी बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला.