नवनीत राणाच्या उमेदवारीवरून महायुतीत नाराजीचा सूर; मित्र पक्षानेच घेतला रवी राणांचा समाचार

Navneet Rana | Ravi Rana | Lok Sabha Election 2024 – खासदार नवनीत राणा यांची भाजपवर उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, उमेदवारी घोषित होण्याआधीच अमरावती जिल्ह्यात महायुतीत नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

आमदार रवी राणा यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता महायुतीमधील शिवसेनेकडून (शिंदे गट) कॅप्टन अभिजित अडसूळ, प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी राणा दाम्पत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

एनडीएमध्ये असणारे सर्व नेते नवनीत राणा यांचा प्रचार करतील आणि त्यांना मी एका मंचावर आणेल आणि त्यांना नवनीत राणाचा प्रचार करावाच लागेल, असा इशारा रवी राणा यांनी दिल्यानंतर महायुतीमधील सर्वच पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे.

कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी रवी राणाच्या वक्तव्याला मी भिक घालत नाही, असे सांगितले. तसेच आमदार बच्चू कडू यांनी तर मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस पेक्षा रवी राणाला घाबरतो, असा मिश्किल टोला लगावला. याशिवाय भाजप नेते तुषार भारतीय म्‍हणले की, रवी राणा हे वैफल्यग्रस्त झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.