राष्ट्रवादी- भाजपमध्ये चुरस वाढणार

नवनाथ बोरकर

डोर्लेवाडी – डोर्लेवाडी-सांगवी जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत महिला आरक्षण होते. यात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या राष्ट्रवादीच्या मीनाक्षी किरण तावरे यांनी भाजपच्या अश्‍विनी युवराज तावरे यांचा पराभव करून विजय संपादन केला होता. यावेळी मात्र गटामध्ये बदल होण्याची संभाव्य शक्‍यता निर्माण झाली आहे. या गटामध्ये बदल होण्याची चिन्हे असल्याची चर्चा सुरू आहे. संभाव्य नवीन गटात चुरशीचे संकेत आहेत.

बारामती तालुक्‍यात पूर्वी 6 जिल्हा परिषद गट होते. पंचायत समितीचे 12 गण होते. मात्र, यात आता जिल्हा परिषदेचा एक गट वाढला असून पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. आता जिल्हा परिषदेचे 7 गट तर पंचायत समितीचे 14 गण झाले आहेत. बारामतीतील महत्त्वाचा गट हा जुना डोर्लेवाडी – सांगवी तर नवीन बदलाची चर्चा सुरू असलेला डोर्लेवाडी- निरावागज गट आहे. या गटात विश्‍वासराव देवकाते हे विरोधात निवडून गेले होते.

त्यांचा अपवाद वगळता या गटात राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आला आहे. मात्र, आता या गटात बदल झाल्यास आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गटात चुरस होणार आहे. जातनिहाय लोकसंख्येचा विचार केल्यास धनगर समाज जास्त असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपाकडून या उमेदवारांचा विचार होऊ शकतो. या गटातील दोन्ही पंचायत समिती गणात मराठा, धनगर, माळी किंवा इतरमध्ये दोन्ही पक्षाकडून उमेदवारी देण्यासाठी विचार केला जाऊ शकतो.

पंचायत समितीसाठी इच्छुकांची मांदियाळी
बारामती शहरांमध्ये पंचायत समितीचे भव्य इमारत उभी झाली आहे. त्यावेळी उद्‌घाटन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भव्य इमारतीत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळणार असल्याचे वक्‍तव्य केले होते. सध्या चर्चेत असलेल्या डोर्लेवाडी – निरावागज गटांतील दोन्ही पंचायत समिती गणात इच्छुकांची संख्या मोठी आहे.

यामध्ये राष्ट्रवादीकडून कुंदन देवकाते, विकास माने, खांडजमधून मिथुन आटोळे, झारगडवाडीमधून अजित बुरुंगले, नितीन शेडगे, पोपट कुलाळ, डोर्लेवाडीमधून अविनाश काळकुटे, विनोद नवले, बाबुराव गवळी, ढेकळवाडीमधून अविनाश भिसे, रासपकडून संदीप चोपडे, शिवसेनेकडून निखिल देवकाते, भाजपाकडून प्रकाश सोरटे, विलास आटोळे हे इच्छुक असल्याची चर्चा आहे.

भाजप जोरदार लढत देणार
डोर्लेवाडी-निरावागज गटात राष्ट्रवादीचे प्राबल्य जास्त असले तरी भाजपची ताकद देखील वाढली आहे. सध्या भाजपाकडून युवा नेतृत्व म्हणून अभिजीत ऊर्फ काका देवकाते हे चर्चेत आले आहेत. त्यांची युवकांमध्ये “क्रेझ’ आहे. त्यांना मानणारा युवक वर्ग मोठा आहे. अभिजीत देवकाते हे आतापासूनच गटांमध्ये भेटीगाठी घेत आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, अशी चर्चा होत आहे. राष्ट्रवादीकडून जगदीश देवकाते, सागर देवकाते, ऍड. हेमंत देवकाते हे इच्छुक आहेत. त्यांनी देखील गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी आणि भाजपाकडून युवकांना डोर्लेवाडी-नीरावागज गटात उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे.