NCP पक्षाची संकट मोचक सोनिया दुहानने व्यक्त केला विश्वास,’अजित पवारांचं बंड २०१९ प्रमाणेच आत्ताही मोडू..’

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना आपल्याबरोबर घेत  शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.  स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इतर नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. या राजकीय नाट्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली. आता त्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून प्रतिक्रिया येत आहेत.

 

 

महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या राजकीय भांडणात एक नाव चर्चेत आहे. ते नाव आहे सोनिया दुहान. सोनिया दुहान यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकट मोचक म्हटले जाते, कारण त्यांनी अनेक प्रसंगी पक्षाला संकटातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

जेव्हा अजित पवार रविवारी राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर सोनिया दुहान यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. यानंतर एका दिवसानंतर सोमवारी शरद पवार यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांची पदोन्नती करून नवी दिल्लीतील राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यालयाच्या प्रभारीपदी नियुक्ती केली.

अशात सोनिया दुहान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एबीपीला दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी अजित पवारांचं बंड २०१९ प्रमाणेच आत्ताही मोडून काढण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.