‘घड्याळ तेच, वेळ नवी…’ राष्ट्रवादीचं नवं गाणं लवकर होणार लॉन्च; अमोल मिटकरी यांची मोठी घोषणा

Amol Mitkari : राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे.

इतकेच नव्हे, तर कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळणार नसल्याने मोठी रणनीती आखावी लागणार आहे. अत्यंत कमी कालावधीत लोकांपर्यंत चिन्ह पोहचविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवार यांना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. त्यांच्यासमोर खूप मोठ चॅलेंज आहे.

मात्र, अश्यातच राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक नवीन घोषणा केली आहे. पक्षचिन्ह आम्हाला दिलेलं आहे. पक्षाचं नाव देखील आमच्याकडे आहे. त्यामुळे घड्याळ तेच आहे… फक्त वेळ नवी असणार आहे आणि हाच आमचा नवीन नारा आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले.

तसेच, एक नवीन गाणं आम्ही या निमित्ताने तयार केलेलं आहे. ‘घड्याळ तेच वेळ नवी…’ असं या गाण्याचं शीर्षक आहे. अजितदादांच्या परवानगीने लवकरच हे गाणे आम्ही लॉन्च करू, असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलतात होते.