एनडीए सरकार स्किझोफ्रेनिया झाल्यासारखं वागतंय : अमर्त्य सेन

मोदी सरकार स्किझोफ्रेनिया झालेल्या मनोरुग्णासारखं वागल्यानेच कोविड १९ चं संकट गडद झाले. दुसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्या वाढली आणि सामान्य नागरिक बेहाल झाले. स्किझोफ्रेनिया या गंभीर मनोरोगात रोगी वास्तव आणि काल्पनिक जगातला फरक ओळखू शकत नाही.

कोविड १९ चं संकट थांबण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोदी सरकार श्रेय उपटण्याच्या नादात होतं, असा गंभीर आरोप नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन यांनी राष्ट्र सेवा दलाच्या ‘फ्रायडे फ्लेम’ या कार्यक्रमात केला.

जैविक आणि वैचारिक कोरोनाविरुद्ध लढत देशातील नागरिकांच्या एकजुटीचा निर्धार यावेळी करण्यात आला. ७ मे पासून गेली पाच शुक्रवार ‘फ्रायडे फ्लेम’ हे ऑनलाईन अभियान सुरु होते. अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातून अमर्त्य सेन यांनी भारतीयांना संबोधित केलं.

अमर्त्य सेन यावेळी म्हणाले, भारताकडे औषध निर्मितीचं कौशल्य आहे. साथ रोगांना प्रतिकार करण्याची भारतीयांची क्षमता मोठी आहे. त्यामुळे भारताची कोरोना महामारीशी लढण्याची क्षमता चांगली होती. पण श्रेय लाटण्याचा मोदी सरकारचा नाद, विजयी होण्याची भावना या अनिष्ट गोष्टींमुळे संकट वाढले. या संकटाला निपटण्याचा चुकीचा प्रयत्न सरकारने केला आणि नागरिकांवर कोरोनाचे संकट लादले.

अमर्त्य सेन यांनी आपल्या भाषणात १७६९ साली अॅनडम स्मिथ यांनी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ दिला. स्मिथ यांनी या लेखात म्हटलंय की, कुणी चांगलं काम करत असेल तर त्याला त्याचं श्रेय मिळतं. अनेकदा श्रेय मिळणं हे व्यक्ती किती चांगलं काम करतोय याचे संकेत असतात. पण श्रेय उपटण्याचा प्रयत्न करणं हे बौद्धिक नादानपणाची खालची पातळी दर्शवतं. खरं तर असं करण्यापासून दूर राहिलं पाहिजे. पण एनडीए सरकारने नेमका तोच नादानपणा केला, असा घणाघाती आरोप अमर्त्य सेन यांनी केला.

भारत आधीच सामाजिक विषमता, मंदगती विकास आणि बेरोजगारीच्या संकटाशी झुंजत होता. सरकारच्या बेजबाबदार धोरणांनी कोरोना महामारीच्या संकटात हे प्रश्न जास्त स्फोटक बनत आहेत. अर्थव्यवस्थेची विफलता आणि सामाजिक एकजुटीचा उडालेला फज्जा यामुळेही भारतावरचं कोरोना संकट अधिक गडद झालं. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक नीती या क्षेत्रात मोठे सार्थक बदल केल्याशिवाय भारताला पुढे जाता येणार नाही. त्यासाठी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक ठरतील, असेही अमर्त्य सेन म्हणाले.